शहरालगतच्या मोराणे (ता. धुळे) शिवारात बनावट मद्य कारखान्यावर धुळे तालुका पोलिसांनी कारवाई केली. यात संशयित तिघांना गजाआड केले. तसेच ९० हजार ७१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
धुळे तालुक्याचे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना सोमवारी (ता. ८) मोराणे शिवारात गतिमंद मुलींच्या बालगृहासमोर एका बंद खोलीत बनावट मद्य तयार केले जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने छापा टाकला. त्या वेळी तिघे बनावट मद्य तयार करीत असल्याचे आढळले. मुद्देमालासह तिघांना ताब्यात घेतले.
संशयित मलिंदरसिंग गुरुमुखसिंग सिकलकर (रा. राजीव गांधीनगर, गुरुकुल शाळेजवळ, धुळे), रमेश गोविंदा गायकवाड (रा. चितोड, ता. धुळे) व भिलू भिवसन साळवे (रा. यशवंतनगर, साक्री रोड, धुळे) यांच्या ताब्यातून ६० हजार ४८० रुपयांच्या ३३६ बाटल्या, चार हजार ३२० रुपयांच्या २४ बाटल्या, पाच हजार रुपयांचा मोबाईल, वीस हजारांची स्कूटी (जीजे १६, एएन १४०९) असा ९० हजार ७१४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर, जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, विभागीय पोलिस अधिकारी, प्रदीप मैराळे, पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव गुट्टे, विजय जाधव, सुनील विंचूरकर रवींद्र राजपूत, रवींद्र सोनवणे, राकेश मोरे, कांतिलाल शिरसाट यांच्या पथकाने ही कारवाई केली.