सर्वसामान्य गावखेडे, वस्तीवाड्या, मोहल्ले वार्ड यामध्ये रहिवासाला असणाऱ्या तळागाळातील ग्रामस्थ, बहुजन समाज, सर्वसामान्य गोरगरीब जनताच खऱ्या अर्थाने "किंगमेकर" बनून, आपल्या मताच्या जोरावर खासदार आमदार यांना लोकसभा - विधान सभेत पाठवीत असते. मात्र निवडून येण्यापूर्वी तळागाळातील सर्वसामान्य मतदार नागरिकांची मनधरणी करून आणि प्रसंगी सामान्यांच्या पायावर डोके ठेवून, खासदार - आमदार झालेली मंडळी निवडून आल्यावर सत्तेत गेल्यावर मात्र सर्वसामान्य मतदारांना पार विसरून जातात. दुरावले जातात. नंतर मात्र त्यांच्या सभोवताली त्यांची चापलूसी करणारे निवडक चार पाच कार्यकर्तेच त्यांना प्रिय वाटू लागतात. व पुढे पुढे तर हे कार्यकर्ते त्यांना सामान्य मतदारांना भेटू देत नाहीत. किंवा खासदार आमदारही सामान्य मतदार आपल्या यशाचे धनी आहेत हे पार विसरून जातात. महादेवाचे नंदी बनलेले हे कार्यकर्ते सामान्य मतदाराची वाटच अडवून ठेवतात. व खासदार आमदारांना व्हीआयपी बनवून ठेवतात. त्यामुळे सर्वसामान्य तळागाळातील लोकांची क्षुल्लक कामे होणे सुध्दा अवघड होऊन जात असतात. परंतु दुदैवाने या सामान्य मतदार जनतेच्या जीवावर खासदार, आमदार नव्हे नव्हे व्हिआयपी झालेल्या राजकारण्याच्या लक्षातच येत नाही. व हे त्यांचेच दुदैव होऊन बसते. तेव्हा त्यांनी सभोवतालच्या चांडाळ चौकडी मधून बाहेर पडून, निट डोळे उघडून, कान जनतेच्या बोलण्याकडे लावून सामान्य जनतेचे म्हणणे ऐकण्यास वेळ दिला पाहीजे. म्हणून हा लेखणी झिजविण्याचा माझा प्रपंच ! तळागाळातील सामान्य माणूस तुम्हाला फार मोठी समस्या केव्हाच सांगतही नाही आणि तुमच्या कडून मोठ्या अपेक्षा सुद्धा ठेवत नाही. सामान्य व्यक्तिच्या फारच छोटया छोट्या अडचणी किंवा समस्या असतात. आणि त्यातही महत्वाचे म्हणजे आपल्या खासदार आमदाराने त्यांच्या व्यस्त दिनचर्ये मधून त्यांचेशी दोन शब्द बोलावे ही त्यांची खरी अपेक्षा असते. मात्र खासदार आमदार हे त्यांच्या चांडाळ चौकडीमधून बाहेर पडतच नाहीत. किंवा त्यांच्या सभोवतालची ही मंडळी , गोरगरीब बहुजनांना त्यांचेशी बोलूच देत नाही. त्यामुळे तळागाळातील, खेडयापाड्यातील गावंढळ, मतदार सुद्धा त्यांचे पासून दुरावले जात असतात. अशाप्रकारे खासदार आमदार यांना निवडून देणाऱ्या गोरगरीब मतदार राजाचा पूर्णतः भ्रमनिरास होतो. तेव्हा जनतेच्या मतदाराच्या भरवश्यावर निवडून आलेल्या खासदार आमदारांनी ही गोष्ट लक्षात घेऊन, आपल्या कार्यकर्त्याच्या गर्दीतून बाहेर पडून थेट सर्वसामान्य मतदारा मध्ये मिसळले पाहीजे . त्यांचेशी संवाद साधला पाहीजे . तळागाळातील लोकांची कामेच कोणती असतात तर १) रेशनकार्ड मिळाले पाहीजे २) घरकुल मिळाले पाहीजे ३) एखाद्या व्यवसाय लघुउद्योगासाठी बँकेच्या मॅनेजरला फोन करून कर्ज द्यायला सांगीतले पाहिजे. ४)निराधार योजनेतून अनुदान मिळाले पाहिजे. ५) एखाद्या कामासाठी तुम्ही फोन केला पाहीजे किंवा शिफारसपत्र दिली पाहीजेत. इत्यादी असल्या प्रकारातील किरकोळ समस्या असतात. मात्र जेव्हा त्यांचेशी भेटण्याचे खासदार-आमदार टाळतात किंवा त्यांच्या सभोवतालची मंडळी त्यांना खासदार आमदारांना भेटू देत नाहीत. तेव्हा मात्र गरीबगुदांचा भ्रमनिरास होत असतो, सामान्य मतदाराची घोर निराशा होत असते. व या खासदार आमदारांना निवडून दिल्याचा त्यांना प्रचंड मनस्ताप होत असतो. पश्चाताप होत असतो व हे खोटं नसून, कटूसत्य असते. हे आपण लक्षात घेतलं पाहीजे. व आपल्या डोळ्यावर धृतराष्ट्रा प्रमाणे असलेली पट्टी सोडली पाहीजे. अन्यथा मतदार जनता तुमच्या विरुद्ध प्रचंड आक्रोश करीत तुमच्या विरुद्ध बंड केल्या शिवाय राहणार नाही. व पुढची भविष्यातील येणारी निवडणूक तुम्हाला सोपी जाणार नाही. म्हणून कृपया उतू नका. मातू नका. घेतला वसा सोडू नका. तुम्हाला निवडून तुमचेवर उपकार करणाऱ्याच्या उपकाराची परतफेड सभोवतालच्या चांडाळ चौकडीच्या मोहजालापायी, अपकाराने करू नका. त्यांच्या मोहजालातून बाहेर पडून उपकारकर्त्या सामान्य मतदाराचे ऐकून घ्या. त्यांच्या सुखंदु:खाचे वाटेकरी व्हा. सर्वसामान्य तळागाळातील लोकामध्ये मिसळून त्यांचे भलं करा आणि तुमचेही जीवन धन्य बनवा. हीच आमची सुद्धा रास्त मागणी आहे .