आज पृथ्वीवरील प्रदुषणामुळे शुद्ध प्राणवायूचे प्रमाण कमी होत आहे. पृथ्वीवरील वनसंपत्ती नष्ट होत आहे . हवा,पाणी, वातावरण प्रदुषीत होत असल्यामुळे कर्करोग, क्षयरोग, डेंगु, मलेरिया, हृदयविकार, अर्धांगवायू,कोरोना सारख्या आजाराचे प्रमाण वाढत असून कृत्रीम प्राणवायू घेण्याची वेळ मानवावर येत आहे. त्यामुळे उशिरा का होईना आता तरी मानवाने जागे होऊन प्रदुषण टाळायला पाहीजे. हल्ली आपल्या देशात चिन सारख्या शत्रू देशाकडून फटाके व त्यासाठी लागणारे मानवी शरीराला अपायकारक व घातक असणारे रसायण येत असते. त्यामुळे आपण प्रदुषणमुक्त दिपावलीचा संकल्प घेऊन फटाकेमुक्त दिपावली साजरी करण्याचे आवाहन महाराष्ट्र शासन वन विभागाच्या हरितसेनेचे सदस्य असलेले तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे. दुसरे महत्वाचे म्हणजे आपण ज्यांना "जगाचा-पोशिंदा" म्हणून ओळखतो. असा आपला "शेतकरी राजा" आज अतिवृष्टिने त्याच्या शेतमालाचे नुकसान झाल्याने संकटात सापडून घायाळ झालेला असल्यामुळे त्याचा दिपावलीचा आनंदच निसर्ग राजाने हिरावून घेतला आहे. शेतकरी राजा व शेतामध्ये राब राब राबणार्या ग्रामिण भागातील तळागाळातील वस्त्या वाड्यांवरील त्याच्या घरात दिपावली साजरी करायला आर्थिक अडचण आहे. अशा परिस्थितीत त्याच्या दुःखाची जाण ठेवून आपणही त्याच्या चिल्यापिल्याला दिवाळी निमित्त गोडधोड खायला मिळावे अशी परमेश्वराकडे प्रार्थना केली पाहीजे व त्यांना त्रास होऊ नये म्हणून फटाकेमुक्त दिवाळी साजरी केली पाहीजे. विशेषतः धनदांडग्या श्रीमत लोकांनी हे लक्षात घ्यायला हवे. अन्यथा श्रीमंतानी हजारो लाखो रुपयाचे फटाके फोडले तर शेतकरी राजाच्या जखमेवर मिठ चोळल्यासारखे होईल. म्हणूनच यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त दिवाळी म्हणून, प्रदुषण मुक्त दिवाळी म्हणून साजरी करण्याचे आवाहन समाजसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.