वाशिम : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या, स्व.संजय गांधी विधवा अनुदान, दिव्यांग अनुदान किंवा श्रावण बाळ अनुदान योजनेच्या सर्वच निराधार लाभार्थ्यांना कळविण्यात येत आहे की,शासनाने लाभाच्या प्रत्येक योजनेकरीता आधारकार्ड आणि मोबाईल नंबर आपल्या बँक खात्याला जोडणे अत्यावश्यक केलेले आहे. त्यामुळे सर्वप्रथम निराधार योजनेच्या लाभार्थ्यांनी आपल्या जवळच्या पंचायत समिती कार्यालय किंवा मुल्जिजेठा म्युनिसिपल हायस्कूलच्या प्रांगणात असलेल्या आधार केन्द्रावर जाऊन आधारकार्ड सोबत आपल्या मोबाईल क्रमांकाची जोडणी करून आत्ताचा नविन फोटो व फिंगर प्रिन्ट अपडेट करून घ्यावे.नंतर अपडेट झालेले हे नविन कार्ड बँकेत देवून बँकेतून ई केवायसी करून घ्यावी व त्या आधारकार्डची प्रत तहसिल कार्यालयाच्या स्व.संजय गांधी योजना विभागात त्वरीत जमा करावी.अन्यथा स्व.संजय गांधी निराधार योजना किंवा श्रावण बाळ योजनेचे हरमहा मिळणारे 1500/-अनुदान कायम स्वरूपी बंद करण्यात येईल.व त्याची जबाबदारी सर्वस्वी लाभार्थ्यांचीच राहील.तसेच सुज्ञ नागरिकांनो आपल्या गावातील किंवा घराशेजारची निराधार मंडळी वृत्तपत्र वाचत नसल्यामुळे त्यांना आधारसोबत मोबाईल नंबर लिंक करून ई -केवायसी करण्याची ही माहिती मिळूच शकत नाही. त्यामुळे समाजसेवा म्हणून सुज्ञ वाचक नागरिकांनी ही माहिती आपल्या शेजारच्या किंवा गावातील निराधारांना देवून त्यांची ई -केवायसी करून द्यावी.असे आवाहन महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त दिव्यांग जनसेवक संजय कडोळे यांनी केले आहे.