मोघण (ता. धुळे) शिवारातील ट्रॅक्टर ट्रॉली चोरीच्या घटनेचा मोहाडी पोलिसांनी छडा लावत बाम्हणे (ता. एंरडोल, जि. जळगाव) येथून संशयिताला गजाआड केले.
त्याच्याकडून साडेअकरा लाखांच्या दोन ट्रॅक्टरसह एक ट्रॉली हस्तगत केली.
मोघण (ता. धुळे) येथील अमृत खेमचंद पाटील यांच्या मालकीचे ट्रॅक्टर (एमएच १८ एन ९०८९ व एमएच १८ एन ९७८५) तसेच ट्रॉली चोरट्याने लंपास केली. याबाबत १८ मार्चला मोहाडी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. यात सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांनी तपासकामी पथक तयार केले.
तपास सुरु असताना झोडगे (ता. मालेगाव) येथील भारत पेट्रोलपंपावर एकाने कॅनमध्ये डिझेल विकत घेतल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणच्या तांत्रिक पुराव्याच्या विश्लेषणाच्या आधारे ही चोरी प्रवीण संभाजी पाटील (रा. बाम्हणे, ता. एंरडोल, जि.जळगाव) याने केल्याचे समजून आले. त्यानुसार पथकाने त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
साडेअकरा लाखाचा मुद्देमाल
तसेच संशयित पाटील याने एंरडोल पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील एक ट्रॅक्टरदेखील चोरी केल्याचे सांगितले. त्याच्याकडून दोन्ही गुन्ह्यातील साडेतीन लाखांचे ट्रॅक्टर (एमएच १८ एन ९०८९), एक लाखाची ट्रॅक्टर ट्रॉली (एमएच १८ एन ९७८५) व सात लाखांचे सोनालीका कंपनीचे ट्रॅक्टर, असा अकरा लाख ५० हजारांच्या दोन ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त केली.
पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक एस. हृषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भूषण कोते यांच्या नेतृत्वात अशोक पायमोडे, शाम निकम, संजय पाटील, किरण कोठावदे, राहुल पाटील, जितेंद्र वाघ, बापूजी पाटील, मुकेश मोरे, जयकुमार चौधरी, चेतन सोनगीरे, प्रितेश चौधरी, विकास शिरसाट, चेतन माळी यांच्या पोलिस पथकाने ही कारवाई केली.
आपल्या प्रतिक्रिया द्या....