आज आपण धान्याला कीड लागू नये यासाठी कोणत्या घरगुती अथवा सामान्य युक्त्या वापरता?*
सहसा प्रत्येक घरात भेडसावणारा सामान्य पण महत्वाचा मुद्दा म्हणजे घरातील वर्षभरासाठी लागणारं धान्य हे कीड मुक्त ठेवणं होय. यासाठी प्राचीन काळापासून ते आताच्या आधुनिक काळात नवनवीन युक्त्या वापरल्या जात आहेत.
प्रश्नकर्त्याने प्रश्नातच घरगुती / सामान्य युक्त्या विचारल्या असल्याने त्या आधारे आपण काय करू शकतो हे पाहू या.
उन्हात वाळविणे - धान्य उन्हात वाळविणे हा पूर्वापार चालत आलेला व आजही तेवढाच महत्वाचा पर्याय आहे. आता आता पर्यंत धान्य खरेदी हि वर्षातून एकदाच म्हणजे मार्च ते मे च्या सुरुवातीपर्यंत व्हायची. मात्र आता वर्षभर दुकानात धान्य मिळत असल्याने तसेच घरातील दोघेही नोकरीतील व्यस्ततेमुळे धान्याच्या साठवणुकी संदर्भात देखभाल व काळजी घेऊ शकत नसल्याने आताशा हि खरेदी महिन्यापरत किंवा लागेल तशी केली जाते.
मात्र वर्षभर साठवणुकीसाठी बाजारातून विविध धान्य जसे गहू, ज्वारी, विविध डाळी विकत आणल्यावर ते लगेचच उन्हात वाळवणे हा सर्वात सोपा, बिनखर्चाचा व खात्रीशीर उपाय आहे. उन्हाळ्यातील सकाळी ९ वाजल्यानंतर तापमान वाढीस सुरुवात होत असल्याने संध्याकाळपर्यत धान्य वाळवण्यासाठी ठेवल्यास दाण्यातील पाण्याचे प्रमाण हे कमी कमी होत जाते. असे किमान तीन दिवस कडकडत्या उन्हात धान्य वाळवत घातल्यास त्यास कीड लागणार नाही हे नक्की.
शेतात तोडणी करतांना दाण्यातील पाण्याचे प्रमाण हे १२ ते १५ टक्क्यापर्यंत असते. त्यामुळे थेट शेतकऱ्याकडून काढणीनंतर लगेचच धान्य खरेदी करत असाल तर नक्कीच त्यात पाण्याचे प्रमाण जास्त असेल. याउलट बाजारातून/ दुकानदाराकडून धान्य खरेदी केल्यास तुलनेने दाण्यातील पाण्याचे प्रमाण कमी असले तरीही ते धान्य पोत्यात भरून एकावर एक असे थप्पी मारून साठवले गेले असल्याने आद्रतेमुळे त्याला कीड लागण्याची शक्यता फार जास्त असते त्यामुळे धान्य कुठूनही घेतले असले तरी ते तीन चार दिवस कडक उन्हात वाळवलेच पाहिजे.
तसेच धान्य वाळवताना काही दाणे दाताखाली चावून त्याच्या कडकपणा चा अंदाज बांधता येतो. यासाठी दाण्यावर दातांनी अंदाजे किती दाब टाकला असता दाणा कसा फुटतो हे लक्षात घेता आले तर फायदाच होतो. दातांनी दाब दिल्यावर दाण्याचे तुकडे तुकडे होत असतील तर धान्य चांगलं वाळल आहे असा अर्थ होतो. चांगल्या प्रकारे वाळवलेल्या धान्यातील पाण्याचे प्रमाण हे ८ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे.
आजही धान्य उन्हात वाळवणे हे इतर पर्यायांपेक्षा जास्त फायद्याचे व विश्वसनीय समजले जाते.
कडूनिंबाचा पाला - अशा प्रकारे धान्य चांगले वाळवून घेतल्यावर ते लोखंडी किंवा प्लास्टिक च्या कोठ्यांमध्ये भरून ठेवले पाहिजे. चुकुनही वाळवलेले धान्य पोत्यात भरून ठेऊ नये. तर कोठीत धान्य भरताना कोठीच व्यास लक्षात घेऊन ठराविक अंतराने कडूनिंबा चा पाला वापरल्यास कीड लागण्याचे प्रमाण फार कमी होते. मात्र हा पाला टाकताना तो किडलेला नाही याची खात्री करावी. शक्यतो जुन्या पाल्यापेक्षा नवीन पालवी वापरलेली जास्त परिणामकारक ठरते. तसेच कोठीच्या एकदम बुडाशी व कोठीतील धान्याच्या वरच्या भागांवर जास्त प्रमाणात पाला आथरावा.
बोरिक पावडर - तांदूळ उन्हात वाळवता येत नाही कारण त्यामुळे तांदुळाचा चुरा होतो. त्यामुळे तांदूळ साठवताना ते मोठ्या भांड्यात काढून घेऊन त्याला हलक्या हाताने बोरिक पावडर चोळणे गरजेचे ठरते. बाजारात मिळणाऱ्या ३० किलोच्या तांदुळाच्या गोणीसाठी १०० ग्राम बोरिक पावडर पुरेसे ठरते. मात्र वापरतांना असे तांदूळ २ - ३ पाण्याने धुऊन घेऊनच वापरली पाहिजे.
धान्यात वायूंचा (fumigant) वापर - आजकाल मेडिकल मध्यें धान्यात ठेवण्यासाठीचे इंजेक्शन मिळतात. ती धान्याच्या कोठीत वरचा भाग हलकासा फोडून रोवली जातात व कोठी हवाबंद झाकणाने बंद केली जाते. इंजेक्शन मधील रासायनिक द्रव्याचे वायू मध्ये रूपांतर होऊन तो वायू पूर्ण कोठीत दरवळत असतो. यामुळे कीड असेल तर ती गुदमरून मरते. मात्र ही पद्धत वापरणं धोक्याचं आहे, कारण यातून निघणारे वायू (सल्फयुरील फ्लूरॉईड, मिथिल ब्रोमाईड, अल्युमिनियम फॉस्फोईड, कॅल्शियम सायनाईड, EDCT) धान्यात शोषले जाऊन अन्ना द्वारे पोटांत जाण्याचा धोका असतो. तसेच अश्या कोठ्यातून धान्य काढतांना त्या विषारी वायूच्या संपर्कात आल्याने चक्कर , भोवळ येणे, गुदमरणे, श्वास जड पडणे असले त्रास होत असतात.
मी स्वतः हा पर्याय उपलब्ध असूनही वापरत नाही.
याशिवाय इतरही अनेक पद्धती वापरून धान्य साठवले जाते जसे
★धान्यात कापूराच्या वड्या ठेवणे.
★काही ठिकाणी धान्यात हळद घातली जाते.
★कधी संपूर्ण लाल मिरच्या किंवा तिखट व मीठ घालून धान्य साठवतात.
★काही जण फक्त साधं मीठ वापरतात.
★कुणी आगपेटीच्या काड्या वापरतात तर
★कुणी कडुनिंबाचे तेल धान्यात घालतात.
★लसणाच्या पाकळ्या किंवा ओल्या अद्रकचे कंद कधीतरी वापरले जातात.
★ कधी तुळशीच्या बिया देखील वापरल्या जातात.
★ बरेचदा लवंग सुद्धा वापरली जाते.
मात्र या पद्धतीच्या वापरावर, उपलब्धतेबाबत मर्यादा येतात तसेच यातील काही पदार्थाचा धान्याला वास लागण्याचा धोका असतो. त्यामुळे त्या सर्वप्रचलीत नाहीत.
काही महत्वाचे मुद्दे
● लोखंडी कोठी वापरत असाल तर ती धुवून घेऊन दोन दिवस सुकू द्यायची, जेणेकरून छोट्या फटीत लपून बसणारे कीटक मारले जातात आणि मग त्यात धान्य भरा.
● लोखंडी कोठीला बुडाशी लपण्यासाठी किडीना जागा असल्याने त्याऐवजी प्लास्टिक च्या मोठाल्या कोठ्या वापरल्यास त्या हवाबंद असल्याने विविध किडी त्यात जगू शकत नाही.
● कोठीत धान्य दाबून भरा.
● कोठीतून वरचेवर धान्य काढू नये.
● धान्य काढतांना ओलसर भांडे चुकूनही वापरू नये.
● धान्य साठवण्याची जागा अडगळीची नसावी, त्या भागाची नियमित स्वच्छता करावी तसेच पाण्यापासून दुर असावी.
● अलीकडे धान्य साठवून ठेवण्याऐवजी लागेल तसे धान्य आणले तर ते लगेचच वापरायचे असल्याने साठवून ठेवण्याची गरजच पडणार नाही.
आपल्या प्रतिक्रिया द्या....