गडचिरोली, दि. ०६ : जिल्ह्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात सुरुवातीलाच वीजांचा कहर पहावयास मिळाला आहे. चामोर्शी तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी गुरूवार ६ जून रोजी सायंकाळच्या सुमारास वीज कोसळून दोघांचा मृत्यू तर दोघे जखमी झाल्याच्या घटना उघडकीस आली आहे.. गुरुदास मनिराम गेडाम (वय ४२) रा. गोवर्धन, वैभव देवेंद्र चौधरी (वय २१) रा.शंकरपूर हेटी असे मृतकांची नावे असून नीळकंठ भोयर रा.तळोधी, मोकासा व लेकाजी नैताम रा. मारोडा हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत असे कळते.
पावसाच्या प्रतीक्षेत असताना आज ६ जून रोजी चामोर्शी तालुक्यात सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळ व त्यानंतर मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट सुरु झाला. दरम्यान याच वेळी गोवर्धन येथील गुरुदास गेडाम हे वैनगंगा नदीच्या काठावर लाकडी नाव बनवत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली यात ते जागीच ठार झाले तर दुसऱ्या घटनेत शंकरपूर (हेटी) येथील वैभव चौधरी यांच्यावरही वीज कोसळली. रुग्णालयात हलविण्यात आले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर तळोधी येथील नीळकंठ भोयर आणि लेकाजी नैताम हे वीज कोसळल्याने जखमी झाले असून त्यांच्यावर गडचिरोली येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर घटनेने खळबळ उडाली असून हवामान विभागाने पुढील तीन तासात जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.