ज्यांच्या नावातच 'दास' आहे.असे 'भगवानदास खेमवानी.' सिंधी समाजाचे सद्गृहस्थ.कारंजा नगर पालिकेत ते वरिष्ठ लिपीक या पदावर कार्यरत होते.साधरणतः नोकरदार आणि तोही 'सिंधी समाजाचा व्यक्ती' त्यामुळे सर्वसाधारणतः अशा व्यक्ती आपले लक्ष्य केवळ आपल्या व्यापारावर,स्वतःवर आणि स्वतःच्या कुटुंबावर केन्द्रीत करतात.इतर समाजापासून त्या अलिप्त रहातात.अशी सर्वसाधारण धारणा असते.परंतु भगवानदास खेमवानी त्याला अपवाद ठरलेत.नगर पालिकेच्या नोकरीत कार्यरत असतांना त्यांनी कारंजेकरांची तन-मन-धनाने सेवा केली. सेवानिवृत्त होताच आपल्या मुलांना व्यवसायात गुंतवून, स्वतःचे जीवन धार्मिक, आध्यात्मिक,सामाजिक कार्यासाठी समर्पित केले. ते सिंधी समाजाच्या पंचायतचे उपमुखीया असून,विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा, जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे ज्येष्ठ संचालक आहेत. तसेच,संपूर्ण भारतातील सिंधी समाजामधून, पंढरीच्या वारकरी संप्रदायात आलेले एकमेव 'पंढरीचे वारकरी' आहेत.गेल्या पंधरा वर्षापासून ते "श्रीक्षेत्र कारंजा दापुरा ते श्रीक्षेत्र पंढरपूर" वारी नित्यनेमाने दरवर्षी पायदळ करतात. त्याशिवाय १) उंबर्डा बाजार कारंजा ते शेगाव २) कारंजा ते माहूर ३) कारंजा ते भामदेवी हिंगलाजपूर ४) कारंजा ते काटेपूर्णा कुरणखेड आणि ५) कारंजा ते धामणगाव पर्यंतच्या वाऱ्या दरवर्षी पायदळ करतात. वारीमध्ये ते भजन प्रवचन देखील करतात.त्यांची हरिभक्ती पाहून स्व.हभप.तुळशीदास महाराज यांनी श्रीक्षेत्र पंढरपूर येथील चंद्रभागेच्या काठावरील आपल्या प्रवचनातून भगवानदास खेमवानी यांना हरिभक्तपरायण ही पदवी बहाल केली होती. कारंजा येथील प्रत्येक धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रमात आयोजकांकडून त्यांची आठवण काढली जाते.एवढेच नव्हे तर एखाद्या ठिकाणी महाप्रसादाच्या जेवणावळी असल्या तर भगवनादास खेमवानी यांनी श्लोक म्हटल्या शिवाय प्रसादाचे सेवन केल्या जात नाही.एवढा गौरव भगवानदास खेमवानी यांनी प्राप्त केल्याचे जय भवानी जय मल्हार वारकरी मंडळाचे दिंडी प्रमुख संजय कडोळे यांनी सांगीतले आहे.