कारंजा : आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था कारंजाच्या वतीने,पर्यावरण मित्र महिला मंडळीनी विविध पर्यावरण विषयक उपक्रमासोबतच, जागतिक महिला दिना निमित्त,विविध प्रकारे मानवी सेवा करण्याच्या उद्देशाने विविध सामाजिक उपक्रम आपल्या कलेच्या माध्यमातून राबवीत दि. ८ मार्च रोजी अनोख्या प्रकाराने अविस्मरणीय ठरेल अशा प्रकारे जागतिक महिला दिन साजरा केलेला आहे. याबाबत सौ सिमाताई सातपुते यांनी महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना दिलेल्या माहितीनुसार,समाजसेवेच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणाऱ्या आणि पर्यावरणाचा समतोल राखण्या करीता संपूर्ण वर्षभर विविध ठिकाणी, समाजातील नागरिकांना पर्यावरणाचे महत्व पटवून देत वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणाऱ्या आदर्श नारीशक्तिचा प्राणवायू देणारी पन्नास वृक्षाची रोपे देऊन सत्कार करण्यात आला. संस्थेच्या सदस्या प्रमिला अंबाळकर यांनी पर्यावरणावर उत्कृष्ट कवितांचे सादरीकरण केले . शिलाताई चिवरकर यांनी व इतर महिलांनी मार्गदर्शन केले. तसेच पर्यावरण संस्थेच्या सर्व महिलांनी मिळून एक नाटिका तयार करून तिचे यशस्वीपणे सादरीकरण केले . अशा प्रकारे जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.