चंद्रपूर : शहर व जिल्ह्यातील दारू दुकानांचे स्थानांतरण करताना पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी आर्थिक देवाणघेवाणीतून राज्य उत्पादन शुल्क विभागाला हेतूपुरस्पर चुकीचे अहवाल पाठवले, असा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी करीत जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, रामनगरचे ठाणेदार निरीक्षक राजेश मुळे, शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुधाकर अंभोरे यांची नावानिशी व पुराव्यासह नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्याआधारावर अहवालाची सखोल चौकशी करण्याचे आश्वासन महानिरीक्षक दोरजे यांनी देशमुख यांना दिली.
चंद्रपूर शहरातील दुकानाच्या स्थानांतराचा मुद्दा मोठा गाजत आहे. माहितीच्या अधिकारातून स्थानांतरणाची घेतलेल्या माहितीत अनेक संशयात्मक व वादग्रस्त मुद्दे समोर आले. त्यामुळे जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख, इमदाद शेख, अमोल घोडमारे यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सिव्हिल लाईन नागपूर येथील नागपूर ग्रामीण परिक्षेत्राच्या कार्यालयात विशेष पोलीस महानिरीक्षक दोरजे यांची प्रत्यक्ष भेट घेत सर्व वादग्रस्त अहवालाची प्रत देत कारवाईची मागणी केली. अहवालांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी पोलीस महानिरीक्षक दोरजे यांनी दिले.
या आहेत अहवालातील वादग्रस्त बाबी
चंद्रपूर कस्तूरबा रोडवरील केडी कॉम्प्लेक्सच्या मंजूर नकाशात प्रवेशद्वारापासून ५० मीटरच्या आत नागदेवतेचे नोंदणीकृत मंदिर, मान्यताप्राप्त टायपिंग इन्स्टिट्यूट व १०० वर्षे जुने वडाचे संरक्षित झाड पोलीस अहवालात नमूद करणे जाणीवपूर्वक टाळण्यात आले.
नागपूर रोडवरील महालक्ष्मी कॉम्प्लेक्समधील प्रस्तावित दारू दुकानाच्या पश्चिमेला शिवशंकर होंडा शोरुम असल्याचे पोलीस अहवालामध्ये नमूद आहे. मात्र प्रस्तावित दारू दुकानाला लागून डाॅ. राम भारत यांचे नोंदणीकृत बालरुग्णालय अहवालात नमूद नाही. दाताळा रोडवरील जुमडे यांच्या इमारतीमधील प्रस्तावित दुकानाशी लोकवस्तीच्या संबंध नसल्याची बाब नमूद करण्यात आली. या दुकानासाठी रस्ता उपलब्ध नसतानाही उत्तरेस असलेल्या खासगी प्लॉटमधून रस्ता दर्शविण्यात आला. बंगाली कॅम्प येथील प्रस्तावित दुकानापासून चंद्रपूर पब्लिक स्कूल सारखी मोठी शाळा जवळ असल्याचे जाणीवपूर्वक दडपण्यात आले. श्रीकृष्ण टॉकीज, बंगाली कॅम्प तसेच नागभीड येथील एका दुकानाविरोधात शेकडो स्थानिक नागरिक, विविध राजकीय पक्ष व संघटना यांनी लेखी विरोध करूनही पोलीस अहवालामध्ये त्याची नोंद घेण्याचे टाळण्यात आले. मात्र बंगाली कॅम्प येथील प्रास्ताविक दुकानापासून दुरच्या अंतरावर राहणाऱ्या आठ-दहा नागरिकांचे दारू दुकानाला समर्थन असल्याची नोंद मात्र पोलिसांनी आपल्या अहवालात आवर्जून केलेली आहे.