कारंजा : शिंदे-फडणवीस सरकारने आगामी नगर पालिका निवडणूकीत नगराध्यक्षांची निवड जनते मधून करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. आणि हौसे, गवसे, नवसे निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे दिसत आहेत. नगराध्यक्ष म्हणजे गावाचा प्रथम पुरुष असते.यावर्षीची नगराध्यक्ष निवडणूक ही आमदाराच्या निवडणूकी एवढीच प्रतिष्ठेची होणार असल्याचे दिसत आहे. तसेच मागील सन २०१७ च्या नगर पालिका निवडणूकीपासून ग्रामीण उमेद्वार आणि मतदारांचा कारंजा शहरातील राजकारणात हस्तक्षेप वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्याकरीता काही तथाकथीत प्रतिष्ठित नेते तर नगर पालिका निवडणूकीपूर्वी शहरातील मतदार यादीत आणि जिल्हा परिषद निवडणूकीत ग्रामीण मतदार यादीत आपल्या नावाची नोंदणी करीत असल्याचा प्रकार सुद्धा सर्रास घडत आहे. त्याशिवाय प्रत्येक पक्षात नगराध्यक्ष पदाचे दहा दहा उमेदवार इच्छुक असल्याचे सुद्धा महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषदेच्या पडताळणीत दिसून येत आहेत. एकमात्र खरे की, यावेळची निवडणूक अत्यंत अटीतटीची होण्याची चिन्हे असून यावेळी कारंजेकर मतदार राजा जागा झालेला असून, विकासा पासून वंचित असलेल्या कारंजा नगरीला चांगले भविष्य मिळावे म्हणून डोळ्यात अंजन घालून म्हणजेच काळजीपूर्वक नगराध्यक्ष निवडणार आहे. बऱ्याच इच्छुक नगराध्यक्षांनी आता तयारीला सुरुवात केलेली असून कारंजेकरांच्या भेटीगाठी घेण्याला आणि त्यांच्या सुख दुःखात सहभागी होण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र या इच्छुक नगराध्यक्षांना नागरीक कारंजा शहराच्या विकासाबद्दल विचारणा करीत त्यांची बोलती बंद करीत असल्यामुळे इच्छुक नगराध्यक्षांची पंचाईत होत आहे . महाराष्ट्र शासन, केन्द्रशासन इ . कडून स्वायत्त संस्थाना निधी उपलब्ध होत असतांना प्रस्ताव सादर करण्यास नगरसेवक कोठेतरी कमी पडत असल्यामुळे कारंजा शहरातील विकासाची बरीच कामे रखडलेली आहेत. नागरीकांकडून १००% कर वसुली करणारी नगरपालिका,साधी नगर पालिकेची स्वतःची इमारत उभी करू शकत नाही . इमारती करीता आलेला निधी परत जातो. मोडकळीस आलेल्या धोकादायक इमारतीमधून आरोग्य विभाग, करविभाग यांचे कामकाज चालते तर काही कार्यालयाना भाड्याच्या इमारतीत कार्यालये थाटावी लागतात. नगर पालिकेच्या स्वमालकीच्या जागा पडीत पडून तेथे अतिक्रमण होत आहेत. प्रधानमंत्री योजना, रमाई घरकुल योजनेची घरकुले नागरीकांना मिळत नाहीत. साधा दिव्यांगाचा निधी दिव्यांगाना दिला जात नाही . बंजरगपेठ येथील जुना मानवी दवाखाना सुरु होऊ शकलेला नाही. महावीर बालोद्यानच्या जागेची देखभाल करीत तेथे वृक्षारोपण करून बाग उभी राहू शकत नाही. रस्ते, नाल्या, विद्युतदिवे, सार्वजनिक मुत्रीघरांची पार वाताहात झाली. मध्यावधी बाजारपेठ असलेल्या, दिल्ली वेशीजवळ कचरा आणि घाणीचे ढिगारे आहेत. सार्वजनिक वाहनतळाची व्यवस्था नाही. नगर पालिकेच्या शाळा विद्यालयाच्या इमारती धोकादायक, कमकुवत झालेल्या आहेत. शिक्षक भरती नाही. एखादा मोठा कार्यक्रम घेण्याकरीता २०-२५ हजार लोकांच्या क्षमतेचे स्टेडीअम किंवा कमितकमी ५-१०हजार लोकांच्या क्षमतेचे सांस्कृतिक सभाग्रह नाही.भाजीबाजार गांधी चौक येथील दुकाने सुरु केली नाहीत. फेरीवाल्यांना व्यवसायाकरीता जागा नाहीत. मुलांना खेळायला मैदाने नाहीत.अशी किती कितीतरी विकासाची क्षुल्लक कामे सुद्धा शहरामध्ये नडलेली आहेत. तिर्थक्षेत्राचे शहर असतांना तिर्थक्षेत्र विकास आराखडयाचा प्रस्ताव ही नगर पालिका तयार करू शकत नाही त्यामुळे आगामी निवडणूकीत मतदार राजा प्रत्येक नगरसेवकाला मागील निवडणूकीत तुम्ही शहरातील कोणती विकासकामे पूर्ण केलीत असा सवाल करून त्यांची बोलती बंद करण्याची चिन्हे आहेत . एकंदरीत पुढील नगराध्यक्षाची निवडणूक म्हणावी तेवढी सरळ सोपी नसून विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक होणार असून या निवडणूकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराची अग्निपरिक्षा होणार असल्याची चिन्हे असल्याचे महाराष्ट्र साप्तहिक ग्रामीण पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसार माध्यमाला कळविले आहे .