नागभीड : अनैतिक संबंधातून एकाने सख्ख्या चुलत भावाचीच हत्या केल्याची घटना बुधवारी (दि. ७) वासाळा मक्ता येथे उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. होमराज भटू भुळे (४०) असे मृतकाचे तर मोहन महादेव भुळे (३१) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी आणि मृतक हे दोघेही एकमेकांचे सख्खे चुलत भाऊ आहेत
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोहनचे होमराजच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. है अनैतिक संबंध होमराजला माहीत झाल्याने त्याची चिडचिड व पत्नीशी भांडणे वाढली. या त्रासाला पत्नीही कंटाळली होती. होमराज हा आपल्या आयुष्यातील अडसर ठरत आहे, अशी आरोपीची खात्री झाल्यानंतर त्याने आपल्यामार्गातील अडसर कायमचा दूर करण्याचे ठरविले. काही दिवसांपासून आरोपी मोहन हा होमराजच्या मागावरच होता
घटनेच्या दिवशी मंगळवारी होमराज हा शेतावर गेला होता. ही संधी साधून आरोपी मोहन हा होमराजच्या शेतावर गेला आणि होमराज बेसावध असल्याचे पाहून धारदार शस्त्राने मानेवर वार केले. होमराज हा मृत झाल्याची खात्री झाल्यानंतर आरोपीने होमराजला शेतातील विहिरीत ढकलून दिले व साळसूदपणाचा आव आणत घरी आला.
हत्येनंतर रुग्णवाहिका बोलावण्यात आरोपीनेच घेतला पुढाकार
मुलगा घरी आला नाही म्हणून होमराजचे वडील मुलाची चौकशी करीत होते. तेव्हा आरोपी मोहन हा मृतकाच्या वडिलाची साथ देत होता, बुधवारी सकाळी आरोपीच होमराजच्या शोधासाठी पुढाकार घेत होता, मृतदेह विहिरीत आढळल्यानंतर पोलिस गावात आले. तेव्हाही तो सोबतच होता. एवढेच नाहीतर मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर रुग्णवाहिका बोलावण्यात त्याचाच पुढाकार होता. मात्र होमराजच्या अंगावरील जखमांचे व्रण लक्षात घेता ही आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा संशय पोलिसांनाआला होता. त्यादृष्टीने पोलिसांची एक चमू कामाला लागली होती.
गावातही आरोपी आणि मृतकाच्या पत्नीचेअनैतिक संबंधांची चर्चा होती. संशयावरून पोलिसांनी आरोपी मोहन याला ताब्यात घेतले आणि बोलते केले तेव्हा आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी भादंविच्या कलम २०३(१), २३८ अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर ठोसरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल काचोरे करीत आहेत.