संगती शेतकरी उत्पादक कंपनी कुरखेडा च्या उद्घाटन सोहळ्यास उद्घाटकीय मार्गदर्शन करताना मा. संजय मीणा, जिल्हाधिकारी गडचिरोली यांचे प्रतिपादन केलें.
गडचिरोली जिल्ह्यात आजीविका ही मुख्यतः जंगल, शेती व निगडीत रोजगार यावर अवलंबून आहे. या व्यतिरिक्त इतर रोजगाराच्या संधी कमी आहेत. अशावेळी दिव्यांग व्यक्तींनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दिव्यांग व्यक्तींना शाश्वत आजीविका मिळावी आणि ते स्वावलंबी बनावेत यासाठी २०२१ मध्ये दिव्यांगांची “संगती शेतकरी उत्पादक कंपनी” स्थापन केली. या कंपांनीचा उद्घाटन सोहळा दिनांक १८ ऑक्टोबर २०२२ ला जिल्हाधिकारी यांचे दालन गडचिरोली येथे आयोजित केला होता. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. संजय मिणा, जिल्हाधिकारी बोलत होते. दिव्यांगांना आत्मसन्मान मिळवायचा असेल तर आत्मनिर्भर बनणे गरजेचे आहे. दिव्यांगांनी स्थापन केलेली ही पहिली शेतकरी उत्पादक कंपनी असून त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी खूप महत्वाचा पैलू आहे. त्यामुळे याला प्रोत्साहन देणे आणि वाढविणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल आणि कामात सतत सोबत असेल असे आश्वासन मा. जिल्हाधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनात दिले.

उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे डॉ. संदीप कराडे, प्रकल्प संचालक, आत्मा, गडचिरोली आणि डॉ. सतीश गोगुलवार, संयोजक, आम्ही आमच्या आरोग्यासाठी, कुरखेडा हे उपस्थित होते. डॉ. संदीप कराडे हे संगती उत्पादक कंपनीच्या स्थापनेपासून सोबत असून त्यांनी आपल्या विभागांतर्गत कंपनीला मदत करण्याची तयारी दर्शविली. तर डॉ. सतीश गोगुलवार यांनी संस्थेच्या दिव्यांग व्यक्ती सोबत करीत असलेल्या कामाची माहिती दिली. आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था ही मागील १५ वर्षांपासून दिव्यांग व्यक्तींसोबत काम करते. यात दिव्यांग व्यक्तींना संघटित करण्यासोबत त्यांना शासकीय कायदे, अधिकार, दिव्यांगांसाठीच्या योजना यावर मार्गदर्शन करत त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनविण्यासाठी प्रयत्न करते. संस्थेने गडचिरोली, चंद्रपुर आणि भंडारा जिल्ह्यातील ३००० पेक्षा अधिक दिव्यांगांना स्वयं-सहाय्यता समूह आणि संघटनेच्या माध्यमातून संघटित केले, कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून १००० पेक्षा जास्त अस्थिव्यंग आणि मुक-कर्णबधिर दिव्यांग युवांना प्रशिक्षित करून त्यापैकी ६५० दिव्यांगांना रोजगार मिळवून दिला तर ३०० पेक्षा जास्त दिव्यांगांना उद्योग करण्यास मदत केली आहे.
श्रीमती. मालुताई भोयर, अध्यक्षा आणि संचालिका, संगती शेतकरी उत्पादक कंपनी यांनी दिव्यांगांनी शेतकरी उत्पादक कंपनी बनविण्यामागील उद्देश्य आणि कामाची माहिती दिली. कंपनीसोबत सध्या ४७६ भागधारक जुडले ज्यात दिव्यांग व्यक्ती, एकल महिला, भूमिहीन, आणि अल्पभूधारक शेतकरी असून कंपनीकडे ३ लक्ष रुपये भांडवल जमा आहे. यात २५० पेक्षा जास्त भागधारक शेळीपालन व्यवसाय करीत आहेत ज्यांना पुढे कंपनी उत्पादन व विक्री सेवा प्रदान करेल. कंपनीमार्फत येरंडी, कुरखेडा येथे स्वतःचे शेळी पालन केंद्र देखील स्थापन केले आहे.
कार्यक्रमात दिव्यांग व्यक्तींसाठी उत्कृष्ठ काम करणारे विदर्भ दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष मा. यशवंत पाटणकर यांचे मा. जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. तर उत्कृष्ट शेळीपालन करणारे दिव्यांग श्री. फाल्गुन भोयर, श्रीमती. वंदना प्रधान, श्री. कानाजी भुते व श्रीमती मालुताई भोयर यांचे सत्कार करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन संगीता तुमडे यांनी केले, प्रास्ताविक मुकेश शेंडे यांनी केले तर श्री. मनोज हनमलवार यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कंपनीचे सदस्य, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष श्री. यशवंत पाटणकर तथा संस्थेचे कार्यकर्ते मनोज मेश्राम, महेश निकुरे, लक्ष्मण लांजे, तन्मय भोयर, प्रतिमा नांदेश्वर, सुश्मिता भोयर यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रतिक्रिया द्या....