"चोहीकडे खड्डेमय रस्ते, केरकचर्याचे ढिग, सांडपाण्याच्या नाल्या तुंडब भरलेल्या, मुत्रीघराचा दुरावस्था, खांबावरील स्ट्रिटलाईट बंद ! घरकुल योजना थंड बस्त्यात आणि तरीही करवसुलीची मात्र गोरगरीबांवर सुद्धा दादागीरी सुरु ."
कारंजा : -
कारंजा शहर मालमत्ता कर वसुली बाबत संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच नगर पालिकामध्ये प्रामाणिक व सरस ठरलेले प्रथम क्रमांकाचे शहर असून विकासाच्या नावावर मात्र भोपळा आहे. मुदतीपूर्वीच येथील कारंजा नगर पालिका कर निरिक्षक,कर्मचारी, घरोघरी दारोदारी फिरून प्रसंगी सर्वसामान्य, तळागाळातील नागरिकावर मानसिक दबाव टाकून सुद्धा मालमत्ता कराची जुलूमी (घरपट्टी) वसूली करून घेत असतात. असे ज्येष्ठ अनुभवी सामाजिक कार्यकर्ते संजय कडोळे यांनी सांगीतले आहे. याबाबत अधिकचे वृत्त असे की, गेल्या जवळ जवळ सात-आठ महिन्यांपासून नगर पालिका लोकनियुक्त अध्यक्ष व सभापती नगरसेवक कार्यकारिनी बरखास्त झाल्यापासून कारंजा नगर पालिकेचा कारभार प्रशासनच पहात आहे . मुख्याधिकारी बदलून गेल्यानंतर सदरहु नगर पालिकेला १००% वेळ देणारा मुख्याधिकारीच मिळालेला नाही . तेव्हापासून संपूर्ण कारंजा शहराची आज रोजी वाताहत लागली आहे . शहरातील मध्यवस्ती असलेल्या, बजरंग पेठ येथील जुना नगर पालिका मानवी दवाखाना चौकात, बाजारपेठेतील दिल्लीवेस, इंदिरा गांधी चौकात, जयस्तंभ चौक, आंबेडकर चौकात केर कचऱ्याचे मोठमोठे ढिगारे दिसून येतात. शहरातील सर्वच रस्ते खाचखड्डयामुळे चाळणी झालेले असल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन दररोज जिजामाता चौक,महात्मा फुले चौक, बजरंगपेठ चौक, काण्णवजीन फाटक लालबहादूर चौक, शहिद भगत सिंगचौक, जयस्तंभ चौक, डॉ आंबेडकर चौक येथे रस्त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन आणि छोट्यामोठ्या अपघातामुळे भानगडी होऊन मारामाऱ्या होतात. फेरीवाल्यांना जागा नसल्यामुळे सुद्धा फेरीवाले उभ्या करीत असलेल्या व्यावसायिक हातगाडयांचा वाहनधारकांना प्रचंड त्रास होतो . शहरात चौका चौकात व प्रत्येक व्यावसायिक इमारतीमध्ये संडास, बाथरूम , मुत्रीघरे नसल्यामुळे स्त्रीयांची कुचंबना होते. टिळक चौक, नेहरू चौकातील दोन मुत्रीघरे घाणीने बरबटलेले असून तेथे दररोज सफाई कामगाराकडून साफसफाई करणे गरजेचे असूनही कधीच साफसफाई होत नाही . व तेथे हात धुण्याकरीता नळाची व्यवस्थाही नाही. नाल्यांची नियमीत सफाई होत नसल्याने नगर पालिका परिसरातील रामा सावजी चौकात, भ. महाविर चौक, म फुले चौक, शिवाजी पुतळ्यामागे नेहरु चौकात नाल्याचे घाण पाणी रस्त्यावर वाहत असते .दारिद्रय रेषे खालील लोकांकरीता राबविण्यात येणारी घरकुल व्यवस्था बंद पडली असून त्या योजनेकरीता पाठपुरावा नाही . शहरातील स्ट्रिट लाईट पोलवरील दिवे लागत नाहीत. कचरा घंटा गाडया नियमीत फिरत नाहीत. सुवर्ण योजने अंतर्गत दारिद्रय रेषेखालील लोकांना नप कडून फेरीवाल्यांना व्यावसायिक कर्ज वाटप बंद आहे. दिव्यांगाना गेल्या दोन वर्षा पासून नपने दिव्यांग निधीचे वाटप केलेच नाही. गरजूंना तातडीने वेळेवर जन्म मृत्युचे दाखले मिळत नाहीत. शिवाय नप मधील संबधित विभागाचा एकही अधिकारी वेळेवर न प मध्ये कर्तव्यावर दिसत नाही. एकंदरीत कारंजा नगर पालिकेचा असा भोंगळ कारभार सुरु आहे .अशा प्रकारे शहराची दुरावस्था झालेली असतांना निलाजरी नगर पालिका मात्र मालमत्ता कराचा भरणा करण्यास ३१ मार्च २०२२ पर्यंत मुदत असतांनाही, सध्या आपल्या करनिरिक्षक व कर्मचार्यांकडून सक्तीची घरपट्टी (मालमत्ता ) कराची वसूली करण्याकरीता मात्र गोरगरीब, तळागाळातील व्यक्तिंवर सक्तीचा तगादा लावत असल्याच्या तक्रारी महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामिण पत्रकार परिषदेकडे प्राप्त झाल्याचे वृत्त असून, नगर पालिकेने मालमत्ता कर वसूली करीता, नागरिकांना मुदत देऊन सौम्य धोरण अवलंबविण्याचे विनंतीवजा आवाहन जिल्हाध्यक्ष संजय कडोळे यांनी प्रसारमाध्यमाद्वारे केले आहे .