वाशिम (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) : सन 2023-24 च्या शैक्षणिक वर्षाकरीता इयत्ता 10 वी नंतरच्या प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशास 1 जूनपासून सुरुवात झाली आहे. प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी https://dta.maharashtra.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा. कमी कालावधीत शालेय शिक्षणानंतर तंत्र शिक्षणातील पदविका हा अभ्यासक्रम रोजगारक्षम बनण्यासाठी एक पर्याय ठरत आहे. पदविका अभ्यासक्रमाच्या एकूण प्रवेशित विद्यार्थ्यांची मागील चार वर्षापैकी तीन वर्षामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांमध्ये सलग 10 टक्के वाढ व मागील वर्षी 15 टक्के वाढ झाली आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाव्दारे विद्यार्थ्यांना दर्जेदार, करीअर आणि रोजगाराभिमूख तांत्रिक शिक्षण देण्याचा तसेच पदविका अभ्यासक्रमाचे प्रवेश वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहे. औद्योगिक क्षेत्रामधील आवश्यक दर्जा आणि भविष्यातील संधीचा वेध घेवून 9 शासकीय व 30 विनाअनुदानित संस्थांमध्ये 2460 प्रवेश क्षमतेचे न्यु इमॅर्जिंग टेक्नॉलॉजी अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहे. पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशित विद्यार्थ्यांकरीता अध्यापनाच्या प्रक्रीयेची अंमलबजावणी ऐच्छीक स्वरुपात मराठी-इंग्रजी व्दिभाषिक माध्यमातून राबविण्यास मान्यता दिली आहे. या शैक्षणिक वर्षामध्ये विकल्प अर्ज भरतांना उमेदवारांना हा व्दिभाषिक अभ्यासक्रम ठळकपणे दर्शविण्यात येणार आहे. अभ्यासक्रमात सुधारणा करतांना 100 पेक्षा जास्त उद्योगातील प्रतिनिधींकडून अभिप्राय घेवून उद्योगांच्या आवश्यकतेनुसार मनुष्यबळ तयार करण्यासाठी हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
इयत्ता 10 वी नंतरच्या प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रीया अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. पदविका अभ्यासक्रम प्रवेशासाठी अर्ज भरण्यास त्यासाठी ऑनलाईन नोंदणी करणे, कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि अर्ज निश्चित करण्यास 1 जूनपासून सुरुवात करण्यात आली आहे. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेच्या तीन फेऱ्या आयोजित करण्यात येणार आहे. यावर्षी ऑनलाईन केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीया ही मोबाईल ॲपवरसुध्दा उपलब्ध आहे. विद्यार्थी त्यांचा केवळ इयत्ता 10 वी/ 12 वीचा आसन क्रमांक नमुद करुन त्यांचा अर्ज भरु शकतील व निश्चित करु शकतील. विद्यार्थ्यांचे प्राप्त गुण सॉफ्टवेअर प्रणालीव्दारे अर्जामध्ये नमुद करण्यात येतील. कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रक्रीये व्यतिरीक्त ई-स्क्रुटीनी संकल्पना राबविण्यात येणार आहे. या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी व त्यांना प्रवेश अर्ज भरणे, त्यांचे समुपदेशन करणे, प्रवेश प्रक्रीयेच्या विविध टप्प्यांवर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्यात 328 सुविधा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. त्याची यादी प्रवेशाच्या संगणकीय प्रणालीवर देण्यात आली आहे.
सुविधा केंद्रांना उदभवणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी जिल्हयात एक नोडल अधिकारी व त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे सुविधा केंद्रांना/संस्थांना प्रवेश प्रक्रीयेसंबंधी काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण असल्यास त्याचे निवारण नोडल अधिकारी करणार आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रीयेच्या महत्वाच्या टप्प्याचे व्हिडीओ संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच पदविका तंत्र शिक्षणाबद्दल माहिती देणारे शाखानिहाय माहिती चित्रपट देखील उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सर्व सुविधा केंद्रांवर विद्यार्थ्यांना मदत केली जाणार आहे ज्या उमेदवाराला कॅप फेरीदरम्यान जागा वाटप केली जाईल. त्यांना कागदपत्राच्या पडताळणीसाठी आणि जागा स्विकृतीसाठी एआरसीकडे जाण्याची अट शिथील करण्यात आली आहे. जागा वाटप झाल्यानुसार हे जागा वाटप नियमानुसार आहे किंवा नाही याची पडताळणी स्वत: लॉगीनमधून करता येणार असल्याची माहिती वाशिम येथील शासकीय तंत्र निकेतनच्या प्राचार्यानी दिली.