आज वृक्ष संवर्धन काळाची गरज आहे. आपण वृक्षारोपण केले, वृक्षाचे योग्य पालनपोषण केले तर त्यांच्यापासून आपल्याला विविध गोष्टी प्राप्त होतात. ज्या भागात वृक्षाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते, त्या भागातील परिसर स्वच्छ आणि निसर्गरम्य पाहायला मिळतो. आपल्या आजूबाजूला असलेली झाडे ही अन्न, वस्त्र, निवारा देतातच पण झाडाची फुले, फळे, पाने, साल यापासून आयुर्वेदीक औषधे बनवून रोगावर उपचार म्हणून वापरतात. वृक्षाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आँक्सीजन मिळते, हवा शुद्ध राहते. सध्या वृक्षांची मोठी तोड करीत आहे, त्यामुळे तापमान वाढते, प्रदुषण वाढल्यामुळे श्वसनाचे, हृदयाचे आजार उद्भवतात. या लेखातून एवढेच घ्यायचे की, प्रत्येक व्यक्तीने एक एक झाड लावून जगवावे. "झाडे लावा झाडे जगवा."
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ।
पक्षीही सुस्वरे आळविती ।।धृ।।
संत तुकाराम महाराज म्हणतात की, वृक्ष आणि वेली हे माझे सोबती आहेत तसेच जंगलातील प्राणी आणि पक्षी माझ्यासाठी देवाची भक्ती त्यांच्या आवाजात करीत आहेत. निसर्गातील प्रत्येक गोष्ट संत तुकारामांना आपल्याशी जोडलेली वाटते आणि ते त्यातच देवाचा आनंद घेतात. त्यांच्या सोबत ते एकरुप होतात. वनातील पशुपक्षी हे सुद्धा पांडुरंग विठ्ठलाचे नामस्मरण करीत आहे असे या अभंगातून सांगत आहे. असच नात आपलं या वनाशी असलं पाहिजे.
येणे सुखे रुचे एकांताचा वास ।
नाही गुणदोष अंगा येत ।।१।।
संत तुकाराम महाराज म्हणतात की, मला या एकांतात खूप आनंद मिळतो. येथे कोणताही चांगला किंवा वाईट विचार माझे मनात येत नाही. गुणदोष अंगा येत नाही म्हणजे कोणत्याही चांगल्या, वाईट गोष्टीमध्ये मन अडकत नाही. मी फक्त निसर्गाच्या सानिध्यात सदा सर्वकाळ रममाण होतो.
आकाश मंडप पृथिवी आसन ।
रमे तेथे मन क्रीडा करी ।।२।।
येथे आकाश हे माझ्यासाठी मंडप (छप्पर) आणि पृथ्वी माझे आसन (बसण्याची जागा) आहे. माझे मन रममाण होते आणि मी तेथेच खेळतो.
कंथा कमंडलु देह उपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ।।३।।
संत तुकाराम महाराज म्हणतात की, माझ्या जवळ फक्त एक गोधडी (कंथा) आणि पाण्याचे भांडे (कमंडलु) आहे. ते मला उपयोगी पडते. वारा त्यांना वेळ किती झाला आहे हे सांगतो. मला वेळेचं भान करून देतो.
हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करुनी प्रकार सेवू रुचि ।।४।।
संत तुकाराम महाराज म्हणतात की, तेथे हरिकीर्तन म्हणजेच भगवंताच्या कथा ऐकतो आणि वेगवेगळ्या प्रकारे ज्ञानमय भोजनाचा आनंद घेतो, आस्वाद घेतो. या वनाच्या सानिध्यात येऊन भजन कीर्तन करा तेव्हा तुम्हाला तुमचा जन्म कशासाठी आहे याची उकल होईल.
तुका म्हणे होय मनाशी संवाद ।
आपुलाचि वाद आपणासी ।।५।।
मनाचा मनाशी संवाद साधायचा असेल तर हीच एकांतासाठी योग्य जागा आहे. वाद न करता स्वतःच्या विचारांशी सहमत होऊन निराकरण करतात. हा अभंग निसर्गाच्या एकांतात राहून आत्मचिंतन आणि देवाच्या भक्तीत तल्लीन होण्याबद्दल आहे.
ज्या वनामध्ये वृक्षवेली, जंगलातील प्राणी तसेच पक्षी सुद्धा एका स्वरांत गाणे गातांना जणूकाही भगवंताची स्तुतीच करीत आहे असे वाटते. हे सर्व सगेसोयरे आनंदाने एकत्र नांदतात. संत तुकाराम महाराजांनी वृक्षाचे महत्त्व सांगताना अतिशय सुंदर अभंग मांडला आहे.
वृक्ष खूप महत्वाची भूमिका बजावतात. आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी झाडे, वेली लावणे फार महत्त्वाचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या एका अभंगातून फुलझाडे, वेली, वृक्ष याबद्दल आपले निसर्गावरील प्रेम व्यक्त करताना म्हणतात.
मोगरा फुलला, मोगरा फुलला ।
फुले वेचिता बहरु, कळियासी आला ।।
निसर्गातील मोगऱ्याचे वेलीला भरपूर कळ्या येऊन बहरु लागला. आज आनंदाने माझे मनाचा मोगरा फुलला आहे. मनातील आनंदाची मोगऱ्याची वेल फुलली आहे. जिकडे तिकडे मोगऱ्याचा सुगंध दरवळत आहे. फुले वेचावीत ती कधी संपतच नाहीत. मनाच्या आनंदाला पारावार नाही. पुढे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात.
इवलेसे रोप लावियेले व्दारी ।
त्याचा वेलु गेला गगनावरी ।।
परमार्थाच्या दारी लावलेले लहानसे रोप, त्याचा वेल गगनापलीकडे वाढत गेला तसेच मनाचा वेल सुद्धा असाच फुलत राहिला पाहिजे. निसर्गातील वृक्ष, वेलीवर संत ज्ञानेश्वरांनी प्रेम केले. ते म्हणतात की, आपल्या मनाचा मोगरा फुलणे ही भाग्याची गोष्ट आहे. संत सावता महाराज आपल्या अभंगात शेत बागाईत लावू असे सांगतात.
आमची माळियाची जात ।
शेत लावू बागाईत ।
कांदा, मुळा, भाजी ।
अवघी विठाबाई माझी ।।
संत सावता महाराज यांनी शेतातील झाडे, रोपे यालाच ईश्वर मानले. कधी पंढरपूरचे विठ्ठलाच्या दर्शनाला गेले नाही. ते बगीच्यातील रोपे यांनाच देव मानू लागले व आपले कर्तव्य पार पाडू लागले. त्यांचे प्रेम बगीच्यातील झाडांवर दिसून येते.
लेखक:-
पुरुषोत्तम बैस्कार मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....