उसाला आगी लागण्याच्या घटना या काळात घडत असतात. महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. उसाला आग लागण्याच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. अशातच एक मोठी बातमी बीड जिल्ह्यातून समोर आलेली आहे.
आज पहाटेच्या सुमारास बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या उसाला आग लागली. जवळच घर आणि इतर वाड्या वस्त्या असल्याने सगळे आले पण डोळ्यासमोर जीव लावलेलं उभं पिक धडाधड जळत होतं. परडी माटेगाव या भागात राहणाऱ्या शेतकरी नवनाथ शेंडगे यांनी तब्बल 4 एकरात उसाचे पिक घेतले होते. याच पिकाला आज पहाटे आग लागली आणि अवघ्या काही मिनिटातच होत्याचं नव्हतं झालं. या आगीमुळे शेंडगे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
विशेष बाब म्हणजे बीड जिल्ह्यात ऊसाला लागणाऱ्या आगीच्या घटनांमध्ये वाढ झालेली आहे. ढोबळ निरीक्षणातून असे समोर आले आहे की, सर्वाधिक आगीच्या घटना या महावितरणच्या चुकीमुळे घडलेल्या आहेत. शोर्टसर्किट, विद्युत तारांची पडझड यामुळे ऊसाला आग लागल्याच्या घटनात मोठ्या प्रमाणत वाढ झाल्याचे दिसून आले आहे.
उसाचे उत्पादन घेत असताना इतर पिकाच्या तुलनेत खूप जास्त खर्च येतो, तसेच वर्षभर पिक जोपसण्यासाठीही वेगळा खर्च असतो. एका रात्रीत होत्याचं नव्हत झाल्याने शेतकऱ्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले होते. किमान झालेला खर्च तरी पदरात पडावा, या हिशोबाने सरकारने मदत करावी, अशी अपेक्षा शेंडगे यांनी व्यक्त केलेली आहे.
आजवर बीड जिल्ह्यात उसाला आग लागण्याच्या घटना बघता आणि एकूण क्षेत्राचे प्रमाण बघता 400 एकरच्या आसपास भरेल. 400 एकर ऊस जळाला म्हणजे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. लोकप्रतिनिधी आणि सरकारने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी लोकांमधून होत आहे.