चंद्रपूर : राज्यातील वीज टंचाईच्या विरोधात 24 एप्रिलला भाजपातर्फे जटपूरा गेट परिसरात सायंकाळच्या सुमारास "कंदिल दाखवा"आंदोलन करण्यात आले. माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात महापौर राखी कंचर्लावार, भाजपा नेते राजेंद्र गांधी, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले, सुभाष कासनगोट्टूवार, प्रकाश धारणे, राहुल पावडे, विशाल निंबाळकर आदी उपस्थिती होते.
यावेळी डॉ. गुलवाडे म्हणाले, राज्यातील सध्याच्या वीजटंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे. दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन आहे. देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आणणार्या आघाडी सरकारचा आम्ही निषेध करतो. देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणाखाली लादलेले भारनियमन संपूर्ण मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, अशी घोषणा गुलवाडे यांनी केली.
सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहताच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे. राज्यातील सुमारे 27 वीजनिर्मिती संयंत्रे बंद किंवा जेमतेम चालवली जात आहेत. विजेची मागणी कमी असतानाच्या काळात करावयाची देखभाल दुरुस्तीची कामे ऐन उन्हाळ्यात हाती घेऊन सरकारने वीजटंचाईच्या समस्येत भर घातली आहे.