गडचिरोली, दि. ६: रेशीम रेलिंग प्रशिक्षणामुळे सुशिक्षित बेरोजगार महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होऊन त्या रेशीम उद्योगात भरारी घेऊ शकतील, असा विश्वास जिल्हा रेशीम विकास अधिकारी अजय वासनिक यांनी व्यक्त केला. बँक ऑफ इंडिया व आरसेटी केंद्र, गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १० दिवसीय रेलिंग प्रशिक्षण शिबिराचा समारोप काल संपन्न झाला.
ही प्रशिक्षण शिबिर जिल्हा रेशीम कार्यालय, आरमोरी अंतर्गत आरसेटी प्रशिक्षण केंद्र, गडचिरोली येथे घेण्यात आले. समारोप कार्यक्रमात जिल्हा अग्रणी बँकेचे प्रशांत भोंगळे, आरसेटी केंद्राचे संचालक कैलास बोलगमवार, रेशीम विकास कार्यालयाचे वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक गिरीश उईके, केंद्र समन्वयक हेमंत मेश्राम तसेच प्रशिक्षणार्थी महिला उपस्थित होत्या.
यावेळी प्रशिक्षणार्थी महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रीमती दांडगे आणि श्रीमती नैताम यांनी या प्रशिक्षणामुळे उद्योजक होण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगत, भविष्यात रेशीम उद्योगात काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
रेशीम रेलिंगचे प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून, पारंपरिक नोकरीच्या शोधापेक्षा स्वतःचा व्यवसाय उभारण्याची संधी मिळेल. यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण आणि आदिवासी महिलांचा आर्थिक विकास वेगाने होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.