अकोला, दि. १० : "चला हवा येऊ द्या"मालिकेतील दमदार कलावंतांच्या धमाल विनोदी सादरीकरणाने आज अकोलेकरांना खळखळून हसविले. हास्याचे फवारे आणि जोडीला महाराष्ट्राच्या फक्कड लावणीने महासंस्कृती महोत्सवाचा आजचा दिवस अविस्मरणीय ठरला.
सांस्कृतिक कार्य व पर्यटन विभाग आणि अकोला जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने लालबहादूर शास्त्री स्टेडियम येथे आयोजित महोत्सवात "चला हवा येऊ द्या"मालिकेतील कलावंतांनी, प्रसिध्द कलावंत मेधा घाडगे यांनी "संस्कृती महाराष्ट्राची" हा कार्यक्रम सादर केला.
प्रसिद्ध मराठी कलावंत कुशल बद्रिके, श्रेया बुगडे, भारत गणेशपुरे, सागर कारंडे, योगेश शिरसाठ या कलावंतांनी उपस्थितांना खळखळून हसविले. हवालदाराच्या भूमिकेत कुशल बद्रिके यांचा व पाठोपाठ गा. तु. उखाणे या भूमिकेत श्रेया बुगडे यांचा मंचावर प्रवेश होताच रसिकांनी टाळ्यांनी प्रेक्षागृह दणाणून सोडले. त्यांच्या "स्किट"मध्ये सतत उखाणे घेत बोलणारी गा. तु. उखाणे नवरा हरविल्याची फिर्याद घेऊन येते आणि त्यानंतर तिच्या हवालदाराशी होणाऱ्या संवादाने धमाल उडवून दिली."मॅरेज ब्युरो"समजून गाडी विक्रेत्याकडे येणाऱ्या विवाहेच्छू युवकाची "स्किट" भारत गणेशपुरे व सागर कारंडे यांनी सादर केली. त्यातील प्रत्येक संवादावर हशा आणि टाळ्या येत होत्या. पुढे
"अहो शेजारी लई दिसांनी झाली भेट" वर सादर फक्कडबाज लावणी मोठी दाद मिळवून गेली.
यांनी "देवा श्रीगणेशा", "शिवरायांची तलवार" ही गाणी गाऊन रसिकांची दाद मिळवली.