वाशिम: जिल्हयातील जानेवारी 2023 ते डिसेंबर 2023 या कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायती व सन 2022 मध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे निवडणूका होऊ न शकलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूका तसेच ग्रामपंचायतीतील रिक्त जागांच्या पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या निवडणूकीसाठी 5 नोव्हेंबर रोजी मतदान व 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक - 2023 दरम्यान मतदान व मतमोजणीच्या दिवशी लोक राजकीय कारणावरुन विनाकारण भांडण व तंटे करतात, त्याचे रुपांतर मोठया भांडणात किंवा घटनेत होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता असते. या सर्व बाबींना प्रतिबंध घालण्यासाठी व निवडणूक प्रक्रियेदरमयान कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या उद्देशाने निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीने संबंधित निवडणूक क्षेत्रात 4 व 5 नोव्हेंबर मतदान प्रक्रियेदरम्यान व 6 नोव्हेंबर रोजी मतमोजणीच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रिया सुरु झाल्यापासून ते मतमोजणीची संपूर्ण प्रक्रिया संपेपर्यंत फौजदारी दंड प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144 चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी लागू केले आहे.
हे आदेश लागू असल्यामुळे 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजतानंतर राजकीय पक्षांनी प्रचार सभा घेऊ नये. राजकीय पक्षांनी धार्मिक स्थळांचा निवडणूकीसाठी वापर करु नये. आचारसंहितेच्या काळात सार्वजनिक ठिकाणी शस्त्र जवळ बाळगता येणार नाही. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी 100
मिटर परिसरात निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. मतमोजणीच्या ठिकाणी 100 मिटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार असल्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.