केंद्र शासनाच्या पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभापासून ब्रम्हपुरी तालुक्यातील अनेक शेतकरी वंचित असल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरीच्या काळात अनेकांचा लाभ बंद झाला असून शासन व प्रशासनाचे नियोजन ढासळल्याचे दिसून येते.
केंद्र शासनाने शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी व शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून केंद्र शासनाने पीएम किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांच्या हितासाठी देशात अमलात आणली. याचा थेट फायदा चार महिन्यांना २ हजार रुपये या स्वरूपात वर्षाला ६ हजार रुपये म्हणून आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ लागले. पीएम किसान योजनेचा फायदा लाखो शेतकऱ्यांना मिळत आहे. परंतु काही शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करून दोन-दोन वर्षे उलटूनसुद्धा सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसून बरेचसे शेतकरी पीएम किसान योजनेपासून वंचित आहेत. काही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ मिळत होता, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे मिळत असलेले पैसेसुद्धाआता बंद झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. बरेचसे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत. तरी शासनाने वंचित असणाऱ्या ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी ब्रम्हपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे. वारंवार बँक खात्याची केवायसी करा, असे सांगितले जाते. ते केल्यानंतरसुद्धा अनेक लाभार्थ्यांना लाभ मिळत नसल्याची माहिती आहे.