परिसरातील शेतकऱ्यांनी इंझोरी कवठळ पांदण रस्त्याच्या प्रलंबित मागणीसाठी दिलेल्या निवेदनात अन्यत्यागाचा इशारा देऊनही सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्याने संतप्त शेतकऱ्यांनी वं. रा. तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीला बुधवारी दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वा. अन्नत्याग सत्याग्रह सुरू केला.
अन्नत्याग सत्याग्रहाच्या पहिल्या दिवशी जगदीश आरेकर व रमेश भोळसे यांनी उपोषणाला सुरुवात केली. सुरुवातीला वं. राष्ट्रसंतांच्या प्रतिमेचे पूजन करून सामुदायिक प्रार्थना घेण्यात आली. अलिकडेच आत्महत्या केलेल्या श्याम शिंदे व देविदास यादव या शेतकऱ्यांच्या प्रतिमांचे पूजन करून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अन्नत्याग सत्याग्रहाचा उद्देश आपल्या प्रास्ताविकेत विशद करताना जगदीश आरेकर म्हणाले की पांदण रस्त्याअभावी शेतकऱ्यांचे होत असलेल्या प्रचंड नुकसानाकडे सरकारचे लक्ष लवकरात लवकर वेधून घेऊन रस्त्याचे काम तत्काळ सुरू व्हावे या उद्देशाने संविधानिक व शांततेच्या मार्गाने हा सत्याग्रह सुरू करण्यात आला आहे.
यावेळी संतोष शिंदे यांनी मनोगत व्यक्त करून सत्याग्रहाला पाठिंबा जाहीर केला. या कार्यक्रमाला हिम्मत राऊत , शंकर नागोलकार, राम पाटील, गोपाल पाटील , सौ वनिता भोळसे, ललिता भोळसे, सुनीता हरमकार ,कल्पना हरमकार, शिवानी भोळसेसे, गजानन ढोक, सुनील दाभाडे, दिलीप राऊत, राम शिंदे, महेंद्र कांबळे, शंकर काळेकर असे असंख्य गावकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राजकुमार दिघडे यांनी केले.