महाभारत नेमकं किती वर्षांपूर्वी झालं, गीता सांगितली तेव्हा अर्जुन आणि कृष्ण किती वयाचे होते, महाभारतातील सैन्याची एकूण संख्या किती,त्यातले मारल्या गेले किती आणि जगले वाचले किती? अशा प्रश्नांची चर्चा पुष्कळ विद्वान लोक करतात.मला या चर्चेमध्ये फारशी उपयुक्तता दिसत नाही! मला वाटते, महाभारत हे प्रत्येक क्षणाला घडतच राहते. शंभर कौरवांसारख्या असंख्य अडथळा करणाऱ्या उपद्रवी गोष्टी आपल्या अवतीभोवती असतातच.पंचज्ञानेंद्रियातून शरीर आणि जीवन चालवणारे पाच पांडव आपल्या देहात राहतात. त्यांच्या आधारे राहणारी आणि त्यांनाही आधार देणारी जीवनशक्ती म्हणजेच द्रौपदी. अहंकार हाच दुर्योधन तसेच दोन्ही बाजूला कलंडणारे अनिश्चित मन म्हणजे अर्जुन आणि निश्चित अशी सर्व गोष्टींच्या पलीकडची अचूक रस्ता दाखवणारी आपलीच विवेक बुद्धी म्हणजे कृष्ण होय! ती विवेक बुद्धी जागे ठेवण्यासाठी गीता श्लोक खूप मदत करतात. आजचे श्लोक पाहा:-
*मनुष्याणां सहस्रेषु कश्चिद्यतति सिद्धये।*
*यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः।।३।।*
*भूमिरापोsनलं वायु: खं मनो बुद्धिरेव च।*
*अहंकार इतीयं मे भिन्ना प्रकृतिरष्टधा।।४।।*
हजारो माणसांमध्ये एखादा सिद्धी मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. प्रयत्न करणाऱ्या आणि सिद्ध झालेल्या लोकांमध्येही एखादा कोणी अगदी यथार्थ जाणतो.पृथ्वी, आप,तेज,वायू,आकाश,मन,बुद्धी आणि अहंकार या आठ गोष्टींच्याद्वारे माझ्यातून बनलेली ही सृष्टी आहे. (असे भगवान कृष्ण म्हणजेच हे अनंत विश्व व्यापणारा परमेश्वर सांगतात.)तिसऱ्या श्लोकाचं चिंतन आपण केलं पाहिजे.हजारामध्ये एखाद्याला सिद्धी मिळवावी असे वाटते आणि सिद्धी मिळालेल्या एवढ्या लोकांमध्ये एखादाच परमेश्वराला तत्वतः जाणतो.
या जगातल्या प्रत्येक गोष्टीत असंच आहे.चांगल्या कामात 'हो, हो'म्हणत टोळी तयार करणारे,गर्दी करणारे सगळीकडे भेटतील.पण चिकाटीने काम करत राहणाऱ्यांची या जगात खूप मोठी कमतरता आहे.शेवटपर्यंत टिकणारे फार थोडे.काम चांगलंच आहे हे कळूनही लोक टिकत नाहीत!ते टिकण्याची क्षमता वाढवली, तर आपल्या स्वतःच्याच आयुष्यामध्ये जे श्रम करायचे किंवा प्रगती करायची, त्यासाठी क्षमता वाढवता येईल.
आपल्याला पंचमहाभूते तर माहित आहेतच.त्यासोबत मन,बुद्धी आणि अहंकार हे तीन गोष्टी अष्टविध प्रकृती बनताना काम करतात.त्याच प्रकृतीतून,सृष्टीतून आपण निर्माण झालो,म्हणजे आपल्यात या तीन गोष्टी निश्चितपणे काम करतात.म्हणून एखाद्याचे मन किंवा बुद्धी यात फरक पडू लागला, की आपण त्या व्यक्तीची प्रकृती ठीक नाही, हे म्हणतो.म्हणजे या गोष्टी प्रकृतीतूनच बिघडलेल्या असतात.त्या दुरुस्त करण्यासाठी मन आणि बुद्धी सोबत असलेला श्लोकात सांगितलेला अहंकार ठीक करावा लागतो.तेच बहुतेक लोकांना करायचे नसते.पण त्याशिवाय आपल्याला पुढे उपाय नाही!
अहंकार नष्ट करायचा.म्हटलं तर खूप कठीण! पण युक्ती वापरून करतो म्हटलं, तर फार सोपे!
जसे एखादी रेष खोडायची नाही, पण तिला अदृश्य करायचे, तर दुसरा उपाय कोणता? तर तो उपाय म्हणजे त्याच रेषेवर आणखी एक जाडी रेषा ओढायची! म्हणजे जाडी रेषा दिसेल.ती छोटी रेषा दिसणार सुद्धा नाही.
मग अहंकार संपवणारी ही जाडी रेषा ओढायची, म्हणजे नेमकं काय करायचं?तर आपला अहंकार सर्व व्यापक करायचा! स्वतः पुरते, स्वतः च्या देहा पुरते, स्वतःच्या कुटुंबा पुरते असा विचार न करता, सारं जग हेच माझ कुटुंब आहे.मला जे जे पाहिजे ते सगळं सगळ्या जगाला मिळाले पाहिजे.मला सुखी व्हायचंच आहे पण एकट्याने सुखी होण्यात काही मजा नाही.माझ्या अवतीभवती असणारे सगळेच आनंदी आणि सुखी झाले पाहिजे यासाठी मी इच्छा करणारच, हा निग्रह झाला,म्हणजे आपला अहंकार छोट्या रेषेतून मोठ्या रेषेमध्ये रूपांतरित झाला!ही मोठी रेषा आपल्याला सगळ्यांनाच काढायची आहे.
अहंकार आपल्याला नकळत म्हणायला लावतो, "मी सुंदर आहे, मी बुद्धिमान आहे, मी सुंदर गातो किंवा गाते.मला छान नाचता येते, मला छान शिकवता येते, माझे बोलणे,माझा आवाज लोकांना आवडतो.मला सुंदर चित्रे काढता येतात, माझं दिसणं अप्रतिम आहे", अशा अनेक गोष्टींमधून अहंकार डोकावतो. हे म्हणू नये असं नाही.या सगळ्या गोष्टींपैकी आपल्याकडे काही असेल,तर स्वतःची एकदा पाठ जरूर थोपटावी की माझ्याकडे काहीतरी विशेष आहेच;पण त्यासोबत एक लक्षात घ्यावं,की या साऱ्या गोष्टी आपलं शरीर मरेल, त्याच वेळेस संपणार आहेत.मग या जगात यापेक्षा मोठी अशी माझी सर्वकाळ असणारी संपत्ती आहे, ती संपत्ती माझी आहे.असा अहंकार मोठा करावा, विराट करावा, विशाल करावा!
सारा जग व्यापून टाकणारा अहंकार पाहिजे.मग आपोआपच 'वसुधैव कुटुंबकम्'हा महामंत्र आपल्या अंतरंगात उमटतो .आणि कुटुंब चार दोन लोकांपुरते न वाटता सारी पृथ्वीच माझे कुटुंब आहे,असे वाटते.या साऱ्या नद्या,पर्वत, सुंदर मूल्यवान रंगीबेरंगी अद्भुत पशुपक्षी, वृक्षवेली,विलक्षण सुंदर असलेली वनराजी, सूर्या,चंद्र,तारे,हवा हे सारे माझ्यासाठी आहे, हे म्हटले,की अहंकार विश्वव्यापक होतो!तो अहंकार आनंदच देतो, त्यात संकुचित पणा नसल्यामुळे दुःखही नाही.
हे अचूकपणे कळलेला कवी 'बी' म्हणूनच 'चाफा बोलेना' या कवितेत म्हणतो, हे विश्वाचे आंगण आम्हा दिले आहे आंदण रे..
मला वाटते,चाफा कवितेचे कितीही अर्थ निघतील,एक अर्थ नक्कीच आध्यात्मिक निघतो.कृष्ण-अर्जुन संवादासारखा शेवटी शेवटी संवाद जाणवतो. शिव जीवाला म्हणतो,की हे सारे जग तुला आंदण म्हणून मिळालेले आहे.हे जीवा म्हणजे चाफ्या, आपण दोघे जीव-शिव उणे केले, तर उरलेले जग, म्हणजे 'जन विषयाचे कीडे, यांची धाव बाह्याकडे'.त्यांच्या मागे न पळता 'आपण करू शुद्ध रस पान रे!'
हे शुद्ध रस पान म्हणजे दिव्य अध्यात्माचे अमृत पिणे आहे.हे ऐकता कक्षणीच'चाफा फुले आला फुलून'अशी ओळ आहे. आनंदित झालेल्या चाफ्याचा आनंद किती म्हणून सांगावा? 'तेजी दिशा गेल्या आटून' म्हणजे जीवाला वाटलेला आनंद साऱ्या विश्वभर पसरला.मग तो जगच्चालक विश्वंभर आणि जीव एकरूप होतात. उरते ते अद्वैत! आणि मग प्रश्न उरतो कोण मी? चाफा?कोठे दोघे जण? सारे द्वैत संपले!उरला केवळ आनंद!
गीतेच्या प्रवासात उरतो केवळ आनंद!
जय श्री कृष्ण!
लेखक : श्रीनिवास राघवेन्द्र जोशी. कारंजा (दत्त) जि.वाशीम.
आपल्या प्रतिक्रिया द्या....