वाशिम : यावर्षीच्या ऋतुचक्रातील उन्हाळा प्रमाणाबाहेर तापल्याचा अनुभव घेत असतांनाच,भारतिय हवामान विभागाने,येत्या चार दिवसातच अंदमान-निकोबार द्विपसमुहावर मान्सूनचे आगमन होणार असल्याची शुभ वार्ता दिल्याचे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष संजय कडोळे यांनी सांगितले आहे. याबाबत तपशील देतांना हवामान विभागाने सांगितले की, "गेल्या दोन महिन्यातील उष्णतेच्या सक्रियतेमुळे हिंदी महासागरासह बंगालच्या उपसागरातील पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग वाढल्याचे आम्ही अनुभवले असून,त्यामुळे आपल्या आकाशात बाष्पयुक्त ढगांची गर्दी वाढलेली आहे. त्यामुळे यंदा अंदमान निकोबार द्विपसमुहावर मान्सूनच्या पावसाचे आगमन दि. १३ ते १५ मे २०२५ रोजी होऊ शकते." त्यामुळे केरळमध्ये नेहमीपेक्षा आठ दिवस अगोदरच पाऊस दाखल होण्याची शक्यता भारतिय हवामान तज्ञांनी वर्तवली आहे. भारतातीलच नव्हे तर आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकरी राजा हवामान तज्ञांच्या मार्गदर्शनावरच आपल्या शेतीचे पूर्व नियोजन करीत असल्यामुळे लवकरच पेरणी करीता जमिनीच्या मशागतीला लागणार आहे. सध्या वाशिम जिल्ह्यातील शेतातील बऱ्याच प्रमाणात नांगरणी झाली असून,उर्वरीत मशागतीच्या कामाला आणि खते व बीभरणाच्या कामाला सुरुवात होणार असून, साधारणत: विदर्भात दि. १० ते १५ जून पर्यंत पावसाचे आगमन होईल असा पूर्वअंदाज व्यक्त असल्याचे संजय कडोळे यांनी कळवीले आहे.