गडचिरोली :-
वाचनालयाच्या माध्यमातून मुलांमध्ये वाचण्याची व स्पर्धात्मक परीक्षांची ओढ निर्माण करता येते तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ,प्रादेशिक व स्थानिक दैनिक घडामोडी ची माहिती मिळवता येते. म्हणून आजच्या स्पर्धात्मक युगात टिकण्यासाठी वाचनालय हे महत्त्वाचे केंद्र असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी कन्नमवार वार्ड क्रमांक 17 मधील नगरपरिषद सार्वजनिक वाचनालय इमारत लोकार्पण सोहळा आणि जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय द्वारा संचालित ग्रंथालयाचे उद्घाटन प्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माझी नगरसेवक गुलाबराव मडावी होते तर प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद गडचिरोलीचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, जगद्गुरु तुकोबाराय सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष शालिग्राम विधाते व सचिव दादाजी चूधरी मंचावर उपस्थित होते.
आमदार नरोटे पुढे म्हणाले वाचनालय हे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान संक्रमण करण्याचे महत्त्वाचे केंद्र असून मी माझ्या मतदारसंघात दरवर्षी ५ असे एकूण २५ अद्यावत वाचनालये सुरू करणार आहे. सदर वाचनालय माझ्याच वॉर्डातील असून येथे अद्यावत अभ्यासिका सुरू करण्यासाठी १० लाखाची आर्थिक मदत आपल्या आमदार निधीमधून यावेळी जाहीर केली.
यावेळी प्रमुख अतिथी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पीदुरकर यांनी या वाचनालयात आवश्यक सोयी, ओपन स्पेस मध्ये गट्टू तसेच संरक्षण भिंतीचे नूतनीकरण करण्याचे आश्वासन दिले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुलाबराव मडावी म्हणाले, सदर वाचनालय मी नगरसेवक असताना माझ्या वार्डासाठी तत्कालीन पालकमंत्री विशेष सहाय्य निधीमधून मंजूर करून आणले होते. परंतु दुर्दैवाने माझ्या वार्डातील लोकांना वाचनालय नको होते त्यामुळे हे वाचनालय या वार्डात स्थानांतरित करण्यात आले. आज हे सुंदर वाचनालय पाहून मला आनंद झाला. ज्ञानाशिवाय जगात दुसरे काही नाही, ज्ञानामुळे मनुष्याची प्रगती झपाट्याने होते म्हणून या वाचनालयाच्या माध्यमातून युवकांनी ज्ञान आत्मसात करावे असे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले.
यावेळी या वाचनालयाच्या उत्कृष्ट बांधकामाबद्दल आणि सहकार्याबद्दल अब्दुल भाई पंजवानी, नगरपरिषद बांधकाम विभागाचे प्रमुख अंकुश भालेराव, माजी नगरसेवक सतीश विधाते, अनिल पोहनकर यांचा शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रस्ताविक शेषराव येलेकर संचालन प्रा.संध्या येलेकर व आभार दादाजी चूधरी यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. सुरेश लडके, इंजि राजेंद्र उरकुडे, दादाजी चापले, चंद्रकांत शिवणकर, पुरुषोत्तम मस्के यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी गोविंदराव बानबले, पांडुरंग घोटेकर, काशिनाथ पाटील डोईजड, देवराव पाटील खेवले, शरद ब्राह्मणवाडे, पांडुरंग नागापुरे, अरुण मुनघाटे,भास्कर नरुले रामकृष्ण ताजने, डॉ रमेश सोनटक्के, दिगंबर पिल्लेवान सह कन्नमवार वार्ड व शिवाजी वार्डातील महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपल्या प्रतिक्रिया द्या....