माणसाच्या जीवनात जिवंतपणी प्रत्येकच सोयीसुविधा मिळत नाहीत. त्यांचा अभाव असतोच; परंतु मृत्यूनंतर तरी त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून कमीत कमी त्यांच्या प्रेताला अखेरची तरी सावली मिळावी व त्यांची अंत्ययात्रा स्मशानात जाण्यासाठी चांगला रस्ता असावा, असे वाटते; परंतु ही सोय प्रत्येक गावात असेलच असे नाही. अशीच काहीशी अवस्था टेंभा ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या स्मशानभूमीची आहे.
टेंभा येथील स्मशानभूमीत अंत्ययात्रा नेण्यासाठी पक्का रस्ता नाही. पावसाळ्यात चिखलातून प्रेत न्यावे लागते. यासाठी गावातील नागरिकांना मोठी कसरत करावी लागते. काही वर्षांपूर्वी स्मशानभूमीत टिनाचे शेड तयार करण्यात आले; परंतु ते शेड पूर्णपणे जीर्ण झाले.ते केव्हाही कोसळू शकते. शेडवरील टिनाचे पत्रे सुद्धा पूर्णपणे उडाले. त्यामुळे शेड भग्नावस्थेत दिसून येत आहे. काही दिवसांतच पावसाला सुरुवात होईल. तेव्हा अंत्यविधी आटोपताना नातेवाईकांना चिखलातूनच जावे लागेल. शिवाय शेड जीर्ण व भग्नावस्थेत असल्याने पावसातच अंत्यसंस्कार आटोपावे लागेल. टॅभा गावातील स्मशानभूमीची समस्या लक्षात घेऊन स्मशानभूमीसाठी निधी मंजूर कराव, अशी मागणी उपसरपंच रामचंद्र कस्तुरे यांनी केले.