वाशिम : सांस्कृतिक कलानगरी असलेल्या कारंजा नगरीमध्ये, सांस्कृतिक नाट्यगृहाला शासनाकडून लवकरात लवकर मंजूरी मिळवून विकास महर्षी स्व.प्रकाशदादा डहाके यांच्या पवित्र स्मृतीप्रित्यर्थ त्यांच्याच नावाने सांस्कृतिक नाट्यगृह व्हावे या मागणी करीता विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे, अभा मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कव्हळकर, लोककलाकार प्रकाश गवळीकर, उमेश अनासाने,प्रदिप वानखडे, कैलाश हांडे, संतोष शेगोकार आदींनी आमदार सईताई डहाके यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना निवेदन दिले सोबतच त्यांनी श्रीमती बुवनेश्वरी एस. जिल्हाधिकारी वाशिम यांना भेटून त्यांचे मार्फतही शासनाकडे तसे निवेदन दिले आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, ऐतिहासिक, धार्मिक, आध्यात्मिक ,सांस्कृतिक कलानगरी कारंजा येथे स्वातंत्र्यापासून आजतागायत.
पर्यंत सांस्कृतिक नाट्यगृह आणि खुले नाट्यगृह असलेले स्वतंत्र व्यासपिठ नसल्यामुळे विविध सामाजिक-धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आयोजना करीता अडचणी येऊन नाट्यकलावंत, लोककलावंत व कलारसिकांची गैरसोय होत आहे.
त्यामुळे कारंजा येथे व्यासपिठ उपलब्ध व्हावे.यासाठी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा तर्फे महाराष्ट्र शासन पुरस्काराने सन्मानित असलेल्या विलोसचे अध्यक्ष संजय कडोळे तथा अभा मराठी नाट्य परिषद नियामक मंडळ मुंबईचे लोकनियुक्त सदस्य नंदकिशोर कव्हळकर यांनी तत्कालिन विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार स्व.प्रकाशदादा डहाके यांचेकडे आपली मागणी रेटून धरलेली होती.व स्वतः सरस्वती उपासक आणि कलारसिक असलेल्या स्व. प्रकाशदादा डहाके यांनी सांस्कृतिक नाट्यगृहाला मंजूरी मिळवून देण्याचे लोककलावंताना अभिवचनही दिले होते. परंतु त्यानंतर स्व.प्रकाशदादा डहाके हे काही काळ सत्तेपासून दूर राहीले व त्यामुळे अद्यापपर्यंत सांस्कृतिक नाट्यगृह मंजूर न झाल्याची खंत सर्व नाट्यप्रेमी,लोककलावंत, कलारसिकांना व स्वतः स्व . प्रकाशदादा डहाके यांनाही जाणवत होती. आज रोजी राज्याच्या सत्तेत डहाके परिवाराचे पुनर्गमन झाले असून,कारंजा मानोरा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान आमदार सईताई प्रकाशदादा डहाके ह्या असल्यामुळे त्यांनी त्यांच्या विकास कामामधून प्राधान्याने शक्यतो लवकरात लवकर कारंजा येथील सांस्कृतिक नाट्यगृहाला मंजूरी मिळवून देऊन विकासमहर्षी स्व. प्रकाशदादा डहाके यांच्याच नावाने येथील सांस्कृतिक नाट्य सभागृह भूखंडासह बांधकाम करून देण्याची मागणी विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा यांनी केली आहे.