आज ३० एप्रिल म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती. व्यक्तीपूजा मान्य नसलेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना त्यांची जयंती साजरी करण्याला विरोध करून ग्रामजयंतीची संकल्पना मांडली. गावातील सर्व जनता सुखी व्हावी, गांवे स्वयंपूर्ण व स्वावलंबी व्हावी हा ध्यास त्यांनी जीवनभर जपला. राष्ट्रसंतांनी ग्रामगीता लिहीली आणि ती ग्रामीण शेतकऱ्यास अर्पण केली. आज सर्व गावोगांवी राष्ट्रसंताची जयंती ग्रामजयंती म्हणून साजरी करण्यात येते.
ग्रामजयंती म्हणजे गावाचा वाढदिवस. एखाद्याचा वाढदिवस साजरा करताना आपण त्या व्यक्तीला सुंदर कपडे आणतो, त्याच्या उज्ज्वल भविष्याबद्दल खरोखरच प्रेम, जिव्हाळा असेल तर त्याच्या प्रगतीसाठी कृतीपूर्ण सहभाग घेतो. ग्रामजयंती संकल्पनेत गावाचा विकास करणे महत्त्वाचे आहे. आपले गाव स्वच्छ, सुंदर आरोग्य संपन्न व्हावे, सर्वामध्ये जिव्हाळ्याची भावना निर्माण व्हावी, गावातील सर्वजण उद्योगशिल व्हावेत, गावातील अनिष्ट प्रथा, परंपरा व अंधश्रद्धा बंद व्हावी, शेती सेंद्रिय पध्दतीने पिकवावी, सर्वांना शालेय शिक्षण मिळावे, गावागांवात व्यायाम शाळा निर्माण करून त्यात कसरतीचे कसब निर्माण व्हावे, गांवात वाचनालय, मैदानी खेळ असावेत, गावातील वृद्ध व्यक्तीचा आदर व्हावा, या विचाराचे संस्कार गावातील तरुणांवर व्हावेत. हे स्पप्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे होते. हे स्वप्न साकार रुपात उतरविण्यासाठी प्रत्येक गावांनी विचार करावा. गावाची सुधारणा करणे म्हणजे राष्ट्रसंतांची ग्रामजयंती साजरी करणे होय.
आज तापमानात वाढ झाली आहे, पृथ्वीवरील ओझोनच्या थरात घट झाली आहे, उद्योगधंदे उभे करण्यासाठी तसेच वाहतुकीकरिता महामार्ग बनविण्यासाठी झाडांची कत्तल होत आहे. जिकडे तिकडे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. आपल्या गावांत ग्रामजयंती दिनी जलयुक्त शिवार सारखे कार्यक्रम राबवा. गावोगांवी वृक्ष लागवडीचे कार्यक्रम राबवावे. ग्रामजयंती साजरी करताना या बाबीचे योग्य नियोजन करून कृती कार्यक्रमाचा आराखडा आखण्याची गरज आहे. लोकसहभागातून गावाच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे शोधता येईल. यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे.
स्वातंत्र्योत्तर काळातील ग्रामपुनर्रचनेचा राष्ट्रसंतानी प्रयत्न केला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे बालपण खेड्यात गेले, त्यावेळी खेड्यातील अवस्था त्यांनी पाहिली आणि प्रत्यक्ष भोगली होती. ती स्थिती दूर करण्याचा त्यांनी निर्धार केला. महात्मा गांधी यांनी ही ग्रामस्वराज्याचे स्वप्न पाहिले होते. तशीच ग्रामरचना करण्याचा प्रयत्न राष्ट्रसंतांनी केला.
खरे नाम निष्काम ही ग्रामसेवा ।
झटू सर्व भावे करु स्वर्ग गावा ।।
कळो हे वळो देह कार्या पडू दे ।
घडू दे प्रभो ! एवढे हे घडू दे ।।
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सश्रद्ध होते पण अंधश्रद्ध नव्हते, म्हणून ते परमेश्वराला प्रार्थना करतात. मात्र प्रयत्नवाद विसरत नाहीत. राष्ट्रसंतांचा खरा पिंड हा आध्यात्मिक होता. त्यांचे स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणे, भूदान यज्ञात भाग घेणे, स्वातंत्र्यानंतरचा त्यांचा राष्ट्रजागर हा ही त्यांच्या आध्यात्मिकतेचाच भाग होता. बुवाबाजी, भ्रमिष्ट व्रते, देवी-देवतांना बळी देणे या कुप्रथांचीही ते हेटाळणी करतात. त्यापासून दूर राहण्यास राष्ट्रसंत सांगतात. ते म्हणतात, सर्वांनी संघटन करून सहकार्य करावे.
तेथे स्वर्गाच्या नंदनवना ।
बहर येई सहजचि ।।
गावाच्या उन्नतीसाठी राष्ट्रसंत आपल्या ग्रामगीतेत ग्रामनिर्माण संकल्पना मांडतात. गावातील लोक जर एकत्र आले तर आपल्या गावाचा विकास निश्चितच साधता येतो. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गाव निर्माण कसं करायच? याकरिता आम्हाला कायकाय करावे लागेल, याचे यथार्थ वर्णन ग्रामगीतेत केलेले आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
हात फिरे तेथे लक्ष्मी शिरे ।
हे सूत्र ध्यानी ठेवून खरे ।
आपुले ग्रामचि करावे गोजिरे ।
शहराहूनि ।।
आपले गाव आपणच छान करावे आणि ते शहराहूनही सुंदर करावे. महाराज सांगतात, "हात फिरे तिथे लक्ष्मी शिरे" हा हात कुणाचा? हा हात कुणा बाहेरचा नाही तर हा हात गावकरी लोकांचा आहे. ज्या दिवशी गावकऱ्यांचा हात गावाकरिता फिरायला लागेल, त्यादिवशी ग्रामनिर्माणाचा प्रारंभ होईल म्हणूनच गावातील मंडळींनी एकत्र येऊन ग्रामसंघटन निर्माण करावे लागेल, तरच सर्व हात एकत्र येतील आणि ते ग्रामनिर्माणाच्या कार्यक्रमाकरिता लागतील. आज गावचा प्रत्येक माणूस शहराकडे धाव घेत आहे. शहराचा विकास होत आहे. खेड्याचा विकास कसा होईल, म्हणून राष्ट्रसंतानी ग्रामगीता खेड्याचा विकास करण्यासाठी ग्रामीण शेतकऱ्यास अर्पण केली. जेणेकरून गावाचा विकास होईल. सशक्त व स्वावलंबी ग्रामगीतेतील महाराजांचे चिंतन व विचार आजच्या परिस्थितीत तंतोतंत प्रासंगिक ठरतात.
आवो सुंदर देश बनाएं ।
सुंदर अपना गांव बनाएं ।।
वं. महाराजांच्या या भजनातील ओवीमधून "ग्रामोदय ते भारत उदय" हे राष्ट्रसंतांचे जीवनध्येय समाजाचे लक्ष वेधून घेते. गावातील सामान्य माणूस उभा झाला, कार्यप्रवण झाला की, गाव व देश उभा व्हायला वेळ लागत नाही. देशातील प्रत्येक गाव असे झाले तर देशाचे सुंदर चित्र साऱ्या जगासमोर येईल. विश्वाची अशीच कल्पना राष्ट्रसंतानी केली आहे.
गाव हा विश्वाचा नकाशा ।
गावावरुनी देशाची परिक्षा ।।
गावागावांत मेळे, कीर्तन, प्रवचनादी कार्यक्रम, व्यसनमुक्ती कार्यक्रम, संस्कार शिबिरे घेऊन समाजजागृतीचे कार्य व्हावे. पोटासाठी कर्म करणे पुण्य नसून, उरल्यावेळी केलेल्या सेवेलाच कर्म, समाजधर्म म्हणावे. गावातील समाज मंदिरे संस्कार केंद्रे व्हावीत. "गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरुन देशाची परिक्षा" असे महाराजांचे म्हणणे होते म्हणून भारतातील खेडी स्वयंपूर्ण, उद्दमशील होण्यासाठी लोकांनीच प्रयत्न करावे, खेडी स्वावलंबी व्हावीत.
गावागावासि जागवा, भेदभाव समूळ मिटवा ।
उजळा ग्रामोन्नतीचा दिवा, तुकड्या म्हणे ।।
ग्रामजयंती दिनी राष्ट्रसंताची ग्रामगीता खऱ्या अर्थाने कृतीत आणण्याचा संकल्प करु या. ग्रामगीतेतील विचार गावात प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न करणे म्हणजेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असणारी ग्रामजयंती होय. ग्रामजयंती निमित्त वंदनिय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना शतकोटी वंदन ! विनम्र अभिवादन !! जयगुरु !!!
लेखक-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....