श्री गणेशोत्सवाला अलीकडे महाराष्ट्रियन संस्कृती मध्ये अलौकीक महत्व प्राप्त झाले असून,या उत्सवाद्वारे समाजाला शांती,सांमजस्य,आनंद आणि नवचैतन्याचा संदेश दिला जात आहे.स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या महापुरुषांनी या श्री. गणेशोत्सवाद्वारे जनजागृती करून स्वातंत्र्याची मशाल तेवत ठेवली आणि स्वातंत्र्य प्राप्ती मिळवून घेतली. हा सुवर्णाक्षरांकित असा श्री गणेशोत्सवाचा महिमा आहे.श्री गणेशाचा उपासक संप्रदाय गाणपत्य नावाने ओळखला जातो.या संप्रदायाचा उगम पंधराव्या शतकात झाला असे मानले जाते.हा संप्रदाय गणेशाची मयूरेश्वर नावाने पूजा करतो. त्यांचा मुख्य मंत्र,गणेश गायत्री मंत्र असा आहे "एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात.॥" आदीशंकराचार्यांनी गणपतीस पाच मुख्य दैवतामध्ये स्थान दिल्यावर अलीकडे गणपतीची दैवत म्हणून लोकप्रियता वाढू लागली.गणपतीच्या उपासकांचा गाणपत्य संप्रदाय निर्माण झाला.पुण्याजवळच्या चिंचवडचे मोरया गोसावी हे गाणपत्य संप्रदायातील एक पुरूष मानले जातात.या संप्रदायात गणपतीवर दोन उपपुराणे रचिली गेली. गणेश पुराणआणि मुदगल पुराण.
नावे
पुराणांमध्ये गणपती हा शिवहर, पार्वतीपुत्र या नावांनी व शंकर पार्वतींचा मुलगा असल्याचे सांगितले जाते. पुराण साहित्यात गणपतीचे अनेक ठिकाणी उल्लेख आहेत. पुराण साहित्यात गणपतीच्या विविध नावांचा उल्लेख आहे. श्री गणपती महाभारत या ग्रंथाचा लेखनिक होता.
गणेश शब्दाचा अर्थ गणांचा ईश वा प्रभू असा आहे.गण म्हणजे शिव व पार्वतीचे सेवक होय. गणांचा अधिपति म्हणून गणपती असेही नाव या देवतेस म्हटले आहे. विनायक हे नाव दक्षिणेत वापरतात.हे नाव "गणपती" नावाशी संबंधित आहे.विनायक या शब्दाचा अर्थ वि म्हणजे विशिष्टरूपाने जो नायक (नेता) आहे तो विनायक.याच अर्थाने गणाधिपती नावही प्रचलित आहे. हेरंब म्हणजे दीनजनांचा तारणकर्ता होय.
वक्रतुण्ड,एकदंत,महोदर, गजानन,विकट आणि लंबोदर ही गणपतीची देहविशेष दर्शविणारी नावे आहेत. गणपतीला इतर काही नावे आहेत त्यांचे अर्थ असे वक्रतुण्ड म्हणजे "ज्याचे तुण्ड (तोंड) वक्र वा वाकडे आहे तो". गणपतीच्या सोंडेमुळे चेहरा थोडासा वक्र दिसतो त्यामुळे हे नाव.एकदंत म्हणजे ज्याला एक दात आहे तो.गणपतीस एक दात असण्याच्या अनेक पौराणिक कथा सांगितल्या जातात.प्रथम कथेनुसार,भगवान परशुरामाने युद्धात गणपतीचा एक दात उपटला.दुसऱ्या कथेनुसार कैलास पर्वतावर गणपतीने रावणास अडवले म्हणून रावणाने गणपतीचा एक सुळा मोडला.[परंतू त्याचा संदर्भ उपलब्ध नाही .] आणखी एका कथेनुसार खेळाखेळातील लढाईत कार्तिकेयाने गणपतीचा एक दात भग्न केला.महोदर आणि लंबोदर शब्दांचा अर्थ अनुक्रमे महा म्हणजे मोठे उदर (पोट) असणारा व लंब वा लांबडे उदर (पोट) असणारा असा आहे. ही दोन्ही नावे गणपतीचे स्थूलत्व दाखवतात.विघ्नराज वा विघ्नेश्वर शब्दाचा अर्थ सकल विघ्न वा बाधांचा अधिपति असा आहे. गणपतीच्या आराधनेने सकल विघ्नाचे निवारण होत असते. पुराणात सर्वत्र गणपतीचा विघ्नाधिपती म्हणून उल्लेख आढळतो.सकल बाधांचा अधिपति व नियंत्रक असल्यामुळे गणपतीस हे नाम प्राप्त झाले.
गणेश संकल्पनेचा ऐतिहासिक आढावा
वैदिक काळ - गणपतीचा प्रथम उल्लेख प्राचीनतम हिंदू धर्मग्रंथ असलेल्या ऋग्वेदात मिळतो. दोन ऋक मंत्र गणानाम गणपतीम् हवामहे...! व विषु सीदा गणपते... ! वैदिक गणपतीचा स्पष्टपणे निर्देश करतात.जरी हा वैदिक गणपती व सध्या पूजिला जाणारा पौराणिक गणपती एक नसला तरी वेदोत्तर काळात ऋग्वेदातील गणपती-ब्रह्मणस्पती-वाचस्पती पासूनच पौराणिक गजवदन-गणेश-विघ्नेश्वर हे रूप निर्माण झाल्याचे संशोधक मान्य करतात.
ऋग्वैदिक गणपतीची दुसरी नावे होती -बृहस्पती,वाचस्पती. ही देवता ज्योतिर्मय मानली जाई.तिचा वर्ण लालसर सोनेरी होता. अंकुश, कुऱ्हाड ही या देवतेची अस्रे होती.या देवतेच्या आशीर्वादाशिवाय कोणतेही इष्टकाम संभव होणार नाही असे मानले जाई.ही देवता कायम "गण"नामक एका नृत्यकारी दलासोबत विराजमान असे व देवतांची रक्षकही मानली जाई.
दुसऱ्या मतानुसार भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रीकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो.गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवी सनाच्या चौथ्या शतकातील कालिदास,इसवी सनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवी सनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही.गुप्त काळापासूनच या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असे अभ्यासक मानतात.
विनायक रूप-
मानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल,कटंकट,उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे.महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे.पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला.याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय.गणेशाचा पार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो.कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात.इसवी सनाच्या सहाव्या शतकातील "पुराणग्रंथा"त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो.गणेश म्हणजेच गण-ईशाचे हत्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते.काही ठिकाणी गणेश व यक्ष नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते. गणपतीच्या हत्तीमुखाचे हेही कारण असावे. "याज्ञवल्क्य संहिता"या ग्रंथात विनायक व गणपतीच्या पूजेचे विवरण सापडते.इसवी सनाच्या सातव्या शतकात रचलेल्या ललित माधव ग्रंथात गणपतीचा उल्लेख आहे.
गाणपत्य संप्रदायाची पुराणे
गणेश ही पौराणिक हिंदू धर्मातील प्रथम पूज्य व त्या एक मुख्य देवता आहे. गणपती संप्रदायाने गणेश म्हणूनव मुदगल या देवतेचा दोन पुराणे व महाकाव्यांत उल्लेखआहे. गणेशाविषयीची सर्वाधिक महत्त्वाची आख्यायिकात अवस्थांतर होय.
गणेश पुराण व मुद्गल पुराण या ग्रंथाच्या रचनाकाळात मतभेद आहेत. यांची रचना साधारणपणे इ.स. ११०० ते इ.स. १४०० मध्ये झाल्याचे मानले जाते. सामान्यपणे गणेश पुराण हा आधीचाव मुद्गल पुराण नंतरचा ग्रंथ मानतात.गणपती अथर्वशीर्षाची रचना इसवी सनाच्या सोळा ते सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंतच्या काळात झाली.
गणेश पुराण – गणेश पुराण गणेशाच्या कथा व पूजापद्धती यासाठी हे पुराण महत्त्वाचे आहे. याचे दोन खंड आहेत - उपासनाखंड आणि क्रीडाखंड किंवा उत्तरखण्ड.उपासना खंडाची अध्यायसंख्या ९२ असून क्रीडाखंडाची अध्यायसंख्या १५५ आहे.उपासनाखंडाच्या ३६ अध्यायांच्या आधारे प्रसिद्ध गणेश सहस्रनाम स्तोत्राची रचना झाली आहे. याचा अनेक ठिकाणी पाठ होतो.क्रीडाखंडाचे अध्याय १३८-४८ गणेश गीता नावाने प्रसिद्ध आहेत.गणपतीने आपल्या गजानन अवतारात ही गीता राजा वरेण्य यास सांगितली. याचे स्वरूप भगवद्गीता ग्रंथाप्रमाणे आहे. कृष्णाऐवजी येथे गणपतीस भगवद्-तत्त्व मानले आहे. क्रीडाखंडात गणपतीच्या चार अवतारांचे वर्णन आहे.
मुद्गल पुराण यात गणपतीच्या आठ अवतारांचे वर्णन आहे.
अथर्वशीर्ष
श्री गणेश अथर्वशीर्ष किंवा गणेश अथर्वशीर्षोपनिषद हा गणपतीविषयीचे प्रधान उपनिषद आहे.महाराष्ट्र राज्यात याचा विशेष प्रभाव आहे.रांजणगाव येथील मंदिरात प्रवेशतोरणावर हा ग्रंथ कोरला आहे.या ग्रंथात गणपतीस सर्व देवीदेवतांच्या रूपात पाहण्यात आले असून सर्व देवतांपेक्षा श्रेष्ठ मानण्यात आले आहे.या ग्रंथावर तंत्र मंत्राचाही प्रभाव आहे. "गं गणपतेयन नमः" हा गणपतीचा बीजमंत्र आहे असा उल्लेख या ग्रंथात येतो. गणेशाच्या तत्त्वज्ञानात्मक रूपाचे वर्णन हे उपनिषद करते. समाजमनात गणेशाचे प्रसिद्ध स्तोत्र म्हणून हे मान्यता पावलेले आहे. एका कथेप्रमाणे कैलासात शंकर पार्वती असतांना शंकर आपल्या पूजाअर्चने करीता शिवाकडे गेले असतांना,माता पार्वती आंघोळीला जात होत्या. त्यावेळी दारावर कुणीतरी द्वारपाल असावे ह्या आवश्यकते मुळे माता पार्वतीने आपल्या अंगावरील सुंगधी उटण्याचा पुतळा करून संजीवनी मंत्राने अभिमंत्रीत करून त्याला आपले बालक बनविले.व आपल्या निवासाचे द्वारावर द्वारपाल म्हणून नेमले.आणि माता पार्वती स्नाना करीता निघून गेल्या.नेमके त्याच वेळी भगवान शंकर आपल्या पुजाअर्चने वरून निवासस्थानी परतले.त्यावेळी या बालकाने भगवान शंकराला अटकाव केला. अखेर भगवान शंकर आणि हा मातृभक्त बालक दोघेही ऐकायला तयार नसल्याने त्या दोघामध्ये घनघोर युद्ध झाले.युद्धात बालकाचा शिरच्छेद होऊन त्याचे शिर ब्रम्हांडात अदृश्य झाले.हे दृश्य माता पार्वतीने पहाताच तिचे अंतःकरण मातृत्वाने भरून आले आणि माता पार्वती विलाप करू लागल्या आणि देवाधिदेव महादेव शंकराला माझ्या बाळाला जीवंत करा असा हट्ट त्यांनी केला. त्यावर शंकरानी अंतःर्ज्ञानाने पाहीले असता त्या बालकाचे शीर ब्रम्हांडात अदृश्य झाले होते. तेव्हा त्यांनी आपल्या शिवगणाला पाठविले आणि त्यांना सांगीतले "तुम्हाला जो सजीव प्राणी सर्वप्रथम दिसेल त्याचे शिर तुम्ही घेऊन या." तेव्हा शिवगणांनी शिवआज्ञा मानून,सर्वप्रथम दिसलेल्या हत्तीचे शिर आणले. भगवान शंकरानी ते शिर बालकाच्या धडाला लावून,अमृत सिंचन आणि संजीवनी मंत्राने अभिमंत्रीत करून बालकाला जीवंत केले. हे बालक म्हणजेच गणेश,गणपती किंवा गजानन होय.पुढे सर्व देवदेवतांनी आपआपली आयुधं आणि आपआपली नावं त्याला देवून सुखकर्ता,दुःखहर्ता,मंगलमूर्ती म्हणून त्याचा गौरव केला.सर्व देवीदेवतांच्या आधी पहिला मान गणपतीला दिला.तेव्हापासून धर्मशास्त्रानुसार आपल्या संस्कृती मध्ये कोणत्याही देवतेची पूजा, यज्ञ समारोह,श्रीमद्भागवत सप्ताह, शुभकार्य, वास्तूसमारंभ,गृहप्रवेश विवाह समारंभ इत्यादी कार्य करतांना आधी मंगलमूर्ती श्री गणेशाचे पूजन केल्या जात असते. आणि त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये श्री गणेशोत्सव म्हणजे सर्वत्र आनंदाची-मांगल्याची पर्वणी म्हणूनच साजरा केल्या जात असतो.हल्ली या उत्सवाद्वारे सांस्कृतिक कार्यक्रमासोबतच सामाजिक उपक्रमांवर भर दिल्या जात असून,प्रत्येक गावोगावी, वार्डा वार्डात अगदी खेड्या पाड्यावर सुद्धा विधायक कार्य केली जात असून विद्यार्थी व महिलांच्या स्पर्धा,मानवसेवी उपक्रम जसे की आरोग्य तपासणी,नेत्रचिकित्सा चष्मे वाटप,रक्तदान शिबीर,वृक्षरोपण आणि संवर्धन ,दिव्यांग निराधारांना साहित्य वाटप तसेच समाज प्रबोधनपर व्याख्याने,किर्तन, सामुहिक जेवणावळी महाप्रसाद आदी कार्यक्रम केल्या जात असतात. त्यामुळे "मांगल्याचे प्रतिक असलेला श्री. गणेशोत्सव मानवसेवा आणि जनजागृती करीता उपर्युक्त ठरल्याचे दिसून येत आहे.
लेखक : संजय कडोळे.
(महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त.) गोंधळीनगर,कारंजा (लाड) जि.वाशिम. मो.9075635338.*
आपल्या प्रतिक्रिया द्या....