जिल्हयात कार्यरत असलेल्या उद्योगांना तसेच इतर क्षेत्रातील उद्योगांना येणाऱ्या अडचणीवर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा उद्योग मित्र समितीची सभा आज 12 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात संपन्न झाली.
सभेत जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना व जिल्हयात असलेल्या उद्योगांना वीज, पाणी व बँक कर्ज याबाबत चर्चा करण्यात आली. श्री. षण्मुगराजन यावेळी म्हणाले, वाशिम हा आकांक्षीत जिल्हा असून उद्योग व्यवसायाला चालना देण्यासोबतच रोजगार निर्मित्तीच्या दृष्टीने काम करावे. जिल्हयातील युवक-युवतींना दरवर्षी विविध प्रकारचे कौशल्यविषयक प्रशिक्षण देण्यात येतात. या कौशल्य प्राप्त युवक-युवतींना एमआयडीसीतील उद्योगात प्राधान्याने रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावे. एमआयडीसी वाशिमसाठी नविन सबसेंटरचा प्रस्ताव महावितरणने त्यांच्या मुख्यालयाला सादर करावा. असे त्यांनी यावेळी सांगितले.
उद्योगांसाठी जेवढे पाणी लागणार आहे, तेवढया पाण्याच्या आरक्षणाचा प्रस्ताव मुख्यालयाला पाठविल्याचे श्री. बोके यांनी यावेळी सांगितले. पाण्याचे आरक्षण केल्यानंतर एमआयडीसी तसा प्रस्ताव मान्यतेसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती श्री. नागडे यांनी दिली. दोन विस्तृत प्रकल्प अहवाल महावितरणने मान्यतेसाठी पाठविले आहे. मंजूर झालेले काम सुरु होईल. वाशिमच्या एमआयडीसीमध्ये औद्योगिक कामामुळे सबसेंटरवर विजेचा वाढता ताण पाहता नविन सबसेंटर तयार करण्याचा प्रस्ताव मान्यतेसाठी मुख्यालयाला पाठविल्याची माहिती श्री. तायडे यांनी दिली. स्थानिक युवक-युवतींना जिल्हयातील उद्योगात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित उद्योगांनी महारोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे. असे आवाहन यावेळी श्रीमती बजाज यांनी केले.
सभेत उद्योगाच्या अनुषंगाने विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. सभेला एमआयडी वाशिमचे अध्यक्ष डॉ. अंगद राऊत, जी.एम. इंडिया सिरामिकचे संदिप धोटे, नविन शर्मा, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्री. खंबायत, मानव विकास मिशनचे जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, सहायक नगर रचनाकार जी.ए. भगत, महावितरणचे कार्यकारी अभियंता रत्नदिन तायडे, वाशिम पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता श्यामकांत बोके, कौशल्य विकास विभागाच्या सहायक आयुक्त सुनंदा बजाज, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी जीवन बोथीकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दिनेश बारापात्रे, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सुरेंद्र कळमकर, दुकाने निरीक्षक ए.एस. धनगर, एमआयडीसीचे उपअभियंता धीरज नागडे, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे प्रतिक माने व संत रोहिदास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक दिनेश भागवतकर यांची उपस्थिती होती .