वाशिम : लोककलावंत म्हणजे आपल्या भारतिय संस्कृतीचे प्रतिक. खऱ्या अर्थाने भारतिय कला-लोककलेद्वारे आपला इतिहास व संस्कृती टिकविण्याचे काम लोककलाकार करीत असतात. त्यामुळेच पूर्वी राजे-महाराजे,बादशहा लोककलावंताना राजाश्रय देऊन त्यांचा समावेश दरबारातील नवरत्नामध्ये करायचे.आणि लोककलावंत राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती आणि समाजप्रबोधन करायचे. व आजही लोककलाकार हे राष्ट्रीय कार्यक्रमाची जनजागृती आणि मनोरंजनातून समाजप्रबोधन करीत आहेत.परंतु आज कलेला राजाश्रय राहीला नाही. "गरज सरो वैद्य मरो" याप्रमाणे निवडणूक काळात विविध राजकीय पक्षाकडून, किर्तनकार, व्याख्याते, साहित्यीक, भिमशाहिर आदी कलावंताना वापरून घेतले जाते. व निवडणूका संपताच कलाकाराची उपेक्षा होते हे केवळ कटूसत्यच नसून वास्तव आहे.त्यामुळे आजही कित्येक कलाकार निराश्रीत,बेघर,भटक्या जमातीचे, पालावर राहणारे आहेत.वृद्धापकाळी तर यांना औषधोपचारावाचून दिवस काढावे लागतात व वेळप्रसंगी हालअपेष्टा होऊन मृत्युला सामोरे जावे लागते. हेही तेवढेच खरे आहे.त्यामुळे यापुढे शासनाकडून कलावंताचा योग्य तो मानसन्मान व्हावा.वृद्धापकाळी त्यांच्या रोजीरोटीची, उदरभरणाची आणि औषधोपचाराची व्यवस्था म्हणून त्यांच्या हक्काचे मानधन मिळावे यासाठी,विदर्भ लोककलावंत संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेऊन,आज बुधवार दि 24 जानेवारी 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे क्रांतिकारी धरणे आंदोलन आयोजीत केलेले असून, कलावंतानी संस्थाभेद,पक्षभेद, गटतट, मतमतांतरे दूर सारून एकजुटीने एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.तसेच सर्वच राजकिय पक्ष, लोकप्रतिनिधी, नेतेमंडळी, पत्रकार बांधवानी लोककलावंताना पाठींबा जाहिर करण्याचे आवाहन केले असून जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील मंत्री, खासदार,आमदार,राजकिय पक्ष यांनी कलावंताच्या विविध मागण्या शासनाकडून पूर्ण करण्याची विनंती विदर्भ लोककलावंत संघटनेचे अध्यक्ष संजय कडोळे यांनी केली आहे.