वाशिम : केंद्र शासनाने किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये मका, ज्वारी, रागी या भरडधान्याचे उद्दीष्टास मंजुरी दिली आहे.किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पुरेशा प्रमाणात शेतकऱ्यांनी नोंदणी करावी याकरीता धान,मका, ज्वारी,रागी या धान्याची ऑनलाईन नोंदणीकरीता ३१ मे पर्यत मुदत देण्यात आली आहे.
जिल्हा मार्केटींग अधिकारी वाशिम यांनी प्रस्तावित केल्यानुसार पणन रब्बी हंगाम २०२३-२४ मधील रब्बी ज्वारी/रागी खरेदीसाठी मानोरा तालुक्यास ए.जे. कारंजा फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. कारंजा या संस्थेची निवड करण्यात आली असून शासकीय धान्य गोदाम मानोरा येथे खरेदी केंद्र उघडण्यास मंजुरी देण्यात आली आहे.या नमुद करण्यात आलेल्या खरेदी केंद्रांव्यतिरिक्त अनावश्यक खरेदी केंद्र उघडली जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच जिल्हा मार्केटींग अधिकारी यांनी अटी व शर्तींचे पालन करुन खरेदी केंद्रावर कार्यवाही करावी. ज्वारी खरेदी ३० जुन पर्यंत सुरु राहील.
जिल्हा मार्केटींग अधिकारी वाशिम यांनी खरेदीचा दैनंदिन अहवाल तसेच शेतकऱ्यांचे चुकारे अदा केल्याबाबतचा तपशील विहीत विवरणपत्रातील माहिती गुगलशिटवर नियमित अद्ययावत करावी.केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करावा. खरेदी केंद्रावर आवश्यक यंत्रणा उपलब्ध असल्याबाबतची खातरजमा करावी. असे जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी एस. यांनी कळविले आहे.