चंद्रपूर, दि. 2 जून : महाराष्ट्र वन विभागाद्वारे ‘वनक्षेत्रातील महिला’ या विषयावर चंद्रपूर वन प्रशासन विकास व व्यवस्थापन प्रबोधिनी येथे 5 व 6 जून रोजी ‘वनशक्ती 2025’ या वनक्षेत्रातील महिलांच्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन दिवसीय या परिषदेमध्ये वन क्षेत्रात कार्यरत देशाच्या विविध भागांमधील महिला चर्चासत्रात उपस्थिती दर्शविणार आहेत.
5 जून रोजी सकाळी 10.30 वाजता राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होईल. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून राज्याचे आदिवासी विकास विभाग मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके, खासदार नामदेव किरसान, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री अभिजीत वंजारी, सुधाकर अडबाले, सुधीर मुनगंटीवार, विजय वडेट्टीवार, किर्तीकुमार भांगडिया, किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, वन विभागाचे अपर मुख्य सचिव मिलींद म्हैसकर, तेलंगाणाच्या वन बल प्रमुख श्रीमती सुवर्णा यांची उपस्थिती असेल.
उद्घाटनानंतर 5 जून रोजीच्या पहिल्या चर्चासत्रात पद्मश्री ‘बीज माता’ राईबाई पोपेरे, कर्नाटक वन विभागाचे सेवानिवृत्त वनअधिकारी मधू शर्मा, मोहर्लीच्या सरपंच सुनीता काटकर, बांबू क्षेत्रातील सामाजिक उद्योजक मिनाक्षी वाळके या सहभागी होतील. या चर्चासत्राचे नेतृत्व केंब्रिज विद्यापीठाच्या पीएच.डी स्कॉलर प्रेरणा बिंद्रा करतील. दुसऱ्या चर्चासत्रात आंध्र प्रदेश वन विभागाच्या सेवानिवृत्त विशेषज्ञ प्रधान मुख्य वनसंरक्षक सी. एस. रामलक्ष्मी, तेलंगणा वन विभागाच्या सुनीता भागवत आणि शिवानी डोगरा, केरळ वन विभागाच्या सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रकृती श्रीवास्तव, मध्यप्रदेश वन विभागाच्या सेवानिवृत्त अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. गोपा पांडे या सहभागी होतील. तेलंगणा वन विभागाच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक आणि वन दल प्रमुख शोभा रॉयुरू या चर्चासत्राचे नेतृत्व करतील.
परिषदेच्या दुसऱ्या दिवशी 6 जून रोजीच्या चर्चासत्रात आरईएसक्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष नेहा पंचमिया, गुजरात वन विभागाच्या रेंज फॉरेस्ट ऑफिसर रसिलाबेन वाढेर, मध्य प्रदेश वन विभागातील पन्ना व्याघ्र प्रकल्पाच्या क्षेत्र संचालक अंजना तिर्की, पर्यावरण पत्रकार आणि संवर्धन जीवशास्त्रज्ञ बहार दत्त सहभागी होतील. दोन दिवसीय ‘वनशक्ती 2025’ परिषदेमध्ये श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी बोटॅनिकल गार्डन, विसापूर आणि ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देण्यात येणार आहे. येथे गट चर्चा, सादरीकरण तसेच वन्यजीव व्यवस्थापन आणि वन्यजीव संवर्धनात महिलांची भूमिका समजून घेतली जाणार आहे.
या चर्चासत्रांचे उद्दिष्ट महिलांच्या वनक्षेत्रातील अनुभवांची देवाणघेवाण, नेतृत्वातील अडचणींची चर्चा, आणि वनक्षेत्रात महिलांच्या सहभागासाठी धोरणात्मक मार्गदर्शन तयार करणे आहे. प्रत्येक चर्चासत्रामध्ये की नोट भाषणे, पॅनेल चर्चा, आणि अनुभव शेअरिंग सत्रे आयोजित केली जातील. या सत्रांमध्ये महिलांच्या वनक्षेत्रातील नेतृत्व, मैदानी भूमिकांमध्ये कायदेशीर सशक्तीकरण, आणि वन्यजीव क्षेत्रातील सहभाग यासारख्या विषयांवर चर्चा होईल. या चर्चासत्रांद्वारे महिलांच्या वनक्षेत्रातील योगदानाची ओळख पटवून, त्यांना आवश्यक असलेल्या धोरणात्मक, कायदेशीर, आणि संरचनात्मक समर्थनाची गरज अधोरेखित केली जाईल. परिषदेच्या शेवटी, महिलांच्या वनक्षेत्रातील सहभाग आणि नेतृत्व वाढवण्यासाठी एक धोरणपत्र तयार करण्यात येईल.
चंद्रपूर वन अकादमीमध्ये होत असलेल्या या दोन दिवसीय परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी विदर्भ तसेच संपूर्ण राज्यातील महिलांनी मोठ्या संख्येत उपस्थित रहावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन बल प्रमुख) शोमिता बिस्वास यांनी केले आहे.
००००००
आपल्या प्रतिक्रिया द्या....