आपल्या जवळ जवळ साठ-पासष्ठ वर्षाच्या जीवनात संपूर्ण आयुष्य साधुसंत आणि योगी पुरुषापेक्षाही अलिप्तवादी जीवन जगणारा पुरुष म्हणजे कारंजा येथील गोंधळीनगरातील रामदास उर्फ बाबाराव शंकरराव कडोळे ! ह्या व्यक्तीचे आई वडील लहान पणीच वारले. समर्थ रामदास स्वामी यांनी सावधान . . ! म्हणताच लग्नातून पळ काढला. त्याचप्रकारे ह्या व्यक्तिने साक्षगंधातून पळ काढत आयुष्यभर ब्रम्हचर्य पाळले. लहानपणी काही दिवस रामदास कडोळे छोटी मोठी मजूरी करायचा पुढे मात्र मजूरी करणेही बंद झाले. कुटूंब नव्हते . कुटूंबात इतर कुणी कुणीही नव्हते. पूर्णतः बेसहारा, निराधार, एकाकी जीवन.रहाण्यास घरदार नव्हते. त्यामुळे लहानपणा पासूनच गोंधळीनगर मधील "सगोन्या - महादेवाचे" छोट्याशा मंदिरातच आश्रय घेतला. रोजची दिनचर्या म्हणजे दररोज सकाळी ऋषी तलावाचा फेरफटका मारला की, जळतण, काड्या गोळा करून आणायच्या, काही भंगार मिळाले तर त्यामध्ये स्वतःची गुजराण स्वतःच करायची. आयुष्यभर कुणाला या व्यक्तिचा त्रास नव्हता की कोणत्या व्यक्तिचा याला त्रास नव्हता. घरदार नव्हते. मतदान कार्ड नव्हते, आधार कार्ड , किंवा रेशनकार्ड नव्हते. आपल्या संपूर्ण जीवनात कोणत्याच शेजाऱ्या पाजाऱ्या कडून किंवा प्रत्यक्ष शासनाकडूनही कधीही कोणतीच एक रुपयाची मदत किंवा सवलत घेतली नाही. आयुष्यभर कारंजा सोडून बाहेरगावी जायचे काम त्याला पडले नाही. कुणाकडे ही व्यक्ती बाहेरगावी गेली नाही किंवा कुणी या व्यक्तीकडे बाहेर गावचे आले नाही. गावात कुणाला काहीही मागत नव्हता. कुणाला भाकर तुकडा मागायचा नाही, कुणाला पैसा मागायचा नाही. किंवा कुणाला कपडालत्ता मागायचा नाही. कुणी नविन कपडे दिले तर ते घालायचे नाहीत. मात्र एखादे वेळी जुनी पुरानी कापडं दिली, स्वतःहून खायला काही दिले तरच ते आनंदाने खायचे. मात्र कधीच कुणासमोर हाथ पसरायचा नाही.कुणी वेडा म्हटले तर ही व्यक्ती वेडी मात्र अजिबात नव्हती. सण असो वा त्यौहार कशाचेही भान नव्हते. कारंजात अगदी जवळचा म्हणावे असे कुणी नव्हते. त्यामुळे ही व्यक्ती पूर्णतः निराधार व बेसहारा होती. भावकीच्या घरा पासून सुद्धा ही व्यक्ती अलिप्तच रहात होती. कुणाशी कधी या व्यक्तीचे भांडण झाल्याचे आजिबात ऐकण्यात नाही. कुणी चिडवले किंवा खिजवले तर स्मित हास्य करून समोरच्याला निरुत्तर करून द्यायचे. हसवायचे.बाहेरच्या जगाचे अजीबात भान नसायचे. अशाप्रकारचे एकाकी जीवन जगत होते. परंतु मागील आठवड्यात आपल्या पासष्ट वर्षाच्या आयुष्यात ही अलिप्तवादी व्यक्ती अचानक आजारी पडली. आणि बेशुद्धच झाली. सरळ सरळ जगाचे भानच राहीले नाही. त्यामुळे मात्र सर्वच शेजारी पाजारी हिंदु-मुस्लिम, जातभाई हळहळले. आयुष्यभर जगरहाटीपासून अलिप्त जीवन जगणार्या रामदास उर्फ बाबाराव शंकरराव कडोळेची अवस्था बघून सर्वच मनातून शहारले.दुःखी झाले. सर्वजण या व्यक्ती करीता मनोमन परमेश्वराकडे प्रार्थना करू लागले. भावकीच्या आणि जातभाई मंडळीनी अखेर त्यांची ही अवस्था बघून त्याला उपजिल्हा रुग्नालय कारंजा येथे भरती केले. यावेळी मुखतः कारंजा येथील आदर्श रुग्नसेवक रमेश वानखडे (देशमुख) यांचे अनमोल सहकार्य लाभले. त्यांनी स्वतः रुग्नवाहिकेतून नेऊन भरती केले. तसेच दररोज देवदूत बनून देखभाल व कपडे बदलाविणे वगैरे निस्वार्थपणे करीत आहेत . हे विशेष.अक्षरशः बेशुद्धावस्थेतच असल्यामुळे अन्न पाण्यावाचून तेथे बेडवर पडून असलेल्या हया व्यक्तीला आज ऑक्सीजनवर ठेवलेले आहे. भावकीची मंडळी सकाळ दुपार सायंकाळ रुग्नालयात जावून चौकशी करीत आहेत.