वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज असताना त्यांनी गुरुकुंज येथे सन १९५७ मध्ये हे सर्वतिर्थ अस्थी विसर्जन कुंड निर्माण केले. ह्या कुंडात भारतातील चारही दिशातील सर्व तीर्थक्षेत्रा मधून गंगा, यमुना, नर्मदा, सरस्वती, कावेरी, ब्रह्मपुत्रा, शरयू, गोदावरी, तापी तसेच अन्य अश्या ३५ नद्याचे गंगाजल कलशामध्ये आणण्यात आले.
१६० वर्षाचे संत स्वामी श्री. सितारामदासजी महाराज यांचे शुभहस्ते महायज्ञ करून कुंडाचे विधिवत पूजन करून हे ३५ कलशातील गंगाजल या कुंडात समर्पित करून अस्थी विसर्जन करण्याकरिता उद्घाटन करण्यात आले.
आपल्या महाराष्ट्रातील भोळ्या लोकांची अस्थी विसर्जनाचे तसेच पिंडदानाचे नावाखाली मोठ्या तिर्थस्थानी पूजाविधी करण्यासाठी ५ हजार ते २५ हजार रुपये घेवून फसवणूक केल्या जाते. वंदनीय महाराज यांनी दूरच्या तीर्थक्षेत्री जावून अश्या कर्मकांडास सामान्य जनता बळी पडू नये. याकरिता या कुंडाचे निर्माण केले आहे. बरेच जण आपले आई, वडील प्रिय जनांच्या अस्थी भीतीपोटी घरा बाहेर गोठ्यात, बाहेर झाडाला लटकवून ठेवतात. आजकाल तर स्मशानाचे ठिकाणी अस्थी कळस ठेवण्याकरिता लॉकर देखील आहे तेथेही बरेच जण अस्थी ठेवतात. घरात आणले तर भूतबाधा, प्रेतबाधा होईल ही भीती मनात असते. ही अंधश्रद्धाच म्हणावी लागेल. भारतातील कोणत्याही मंदिरात अस्थीला प्रवेश देणे हे निषिद्ध मानले जाते .परंतु गुरूकुंज आश्रम मध्ये सकाळी ५ ते ७ वेळात नियमित होणाऱ्या सामुदायिक ध्यानाचे प्रसंगी प्रार्थना मंदिरात या अस्थी ठेवल्या जातात. परंतु आजपावेतो या आश्रमातील कुणालाही कसलीही भूतबाधा झालेली नाही. अस्थी प्रार्थना मंदिरात ठेवल्यानंतर सामुदायिक ध्यानाचे वेळी नामजप, भजन, ग्रामगीता, भगवत गीता पठण, आत्मचिंतन शांतीपाठ घेतला जातो. तदनंतर अस्थीविसर्जन कुंडात सकाळच्या पवित्र वातावरणात अस्थी विसर्जन करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली जाते.
याप्रसंगी आदरणीय उद्धवजी वानखडे दादा राष्ट्रसंत यांचे ग्रामगीतेतील प्रमाण व विविध व्यावहारिक उदाहरणे देवून प्रभावीपणे उपस्थित आप्तेष्ट यांना मार्गदर्शन करतात. त्यामध्ये या सर्वतिर्थ कुंडाचे महत्व विषद करून वंदनीय महाराज यांचे ग्रामगितेतील अंत्यसंस्कार, अस्थी विसर्जन व दशक्रिया, तेरवी, मासिक श्राद्ध, अकरमास,[वर्षश्राद्ध हे कार्यक्रम, मृत्यू रहस्य विचार याबाबत चिंतन व्यक्त करतात. पिंडाला कावळ्याने स्पर्श केला तर आपले वडीलास स्वर्ग प्राप्त होते. आपले वडील कितीही पुण्यवान, परोपकारी असेल परंतु त्यांचे पिंडास काकस्पर्श झाला नाही तर ते नरकात जातील, मुक्त होणार नाही अश्या भ्रामक गैरसमजुती अंधश्रद्धा यापासून आपण सावध असले पाहिजे. आपण ग्रामगीतेतील २२ वा अध्याय अंत्यसंस्कार हा अवश्य वाचावा. त्यात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी या विषयी सविस्तर माहिती देवून समाजाला जागृत केले आहे.
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा, स्वामी संत श्री. सितारामदासजी महाराज, संत सत्यदेव बाबा, संत पुंडलिक बाबा, संत लहानुजी बाबा, संत अच्युत महाराज, संत दामोधर बाबा, संत छोटुजी महाराज, संत नत्थुबाबा मोझरकर महाराज ह्या महान संतांच्या तसेच अनेक संत महात्मे, जीवन प्रचारक तसेच लाखो भाविक यांच्या अस्थींचे विसर्जन या कुंडात आजपावेतो झालेले आहे.
अस्थी विसर्जन करिता अन्य कुणाचेही पाय इकडे गुरुकुंजाकडे ओढवत नाही परंतु आपण परम भाग्यवान, पुण्यवान आहात की, आपण येथे अस्थी घेवून आले आहात. आई, वडिल, सासू , सासरे म्हातारे झाले ते काही जणांना अडगळीचे, निकामी वाटतात व त्यांना नाईलाजाने वृद्धाश्रमात राहावे लागते. जिवंतपणी त्याची सेवा करणे, त्यांचा आदर सन्मान करणे आपले कर्तव्य आहे. आपण जिवंतपणी त्यांची मनोभावे सेवा करीत नाही परंतु त्यांचे मृत्यू नंतर तेरवी व अन्य विधिवर २५ ते ५० हजार रुपये आपण जो व्यर्थ खर्च करतो तो करण्याची काहीही आवश्यकता नाही. समाज काय म्हणेल या भीतीने एखादा गरीब व्यक्ती तेरवीवर खर्च करून कर्ज
बाजारी होतो. व नंतर बरेच दिवस तो कर्ज फेडण्यात घालवतो. ज्यांचेकडे पैसा आहे त्यांनी हा खर्च वाचवून आपले आई वडील यांचे स्मृती प्रित्यर्थ त्यामधून एखाद्या गरीब, गरजू परिवारातील मुलीचे कन्यादान करा किंवा गरजू विद्यार्थ्यांस शिक्षणाकरिता मदत करा. त्यामुळे त्यांचे जीवन उज्वल होईल. याचे पुण्य आपले पदरात पडेल व मृत आत्मास खरी शांती मिळेल असे विचार श्री. उध्दवदादा वानखेडे यांनी व्यक्त केले. हे विचार श्रवण करून दुःखी मनाने आलेले सर्व आप्तेष्ट समाधान, शांती घेवून येथून जातात.
गुरुकुंज येथील या सर्वतिर्थ अस्थी विसर्जन कुंडात आमचे संत मोझरकर महाराज परिवारातील मोठे वडील, माझे बाबा, आई, आत्या, सासू, सासरे तसेच अन्य नातेवाईक यांचे अस्थींचे विसर्जन आम्ही येथे केलेले आहे. आम्ही अस्थी कलश बाहेर न ठेवता आमचे घरात पुजा स्थानी ठेवतो. नुकतेच १३ जून २०२५ रोजी आमचे काका डॉ. रामकृष्ण बैसकार नाशिक यांचे अस्थीं विसर्जन करण्यास गेलो होतो. त्यादिवशी १२ परिवाराने विधिपूर्वक अस्थी विसर्जन केले. येथे अस्थी विसर्जन करण्यास कोणताही खर्च येत नाही. विशेष असे की, अस्थी विसर्जन करण्याकरिता कोणताही खर्च न येताही गुरुकुंज या महान पवित्र स्थळी अस्थी विसर्जन केल्याचे आत्मिक समाधान आपणास नक्कीच प्राप्त होते. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
इस सर्व तीर्थ कुंड मे सब तीर्थका जल है भरा ।
सब संत अरु सब देवता का वरद इसको है पुरा ।।
जो अस्थीया सद्भाव से इस पुण्य जल मे डालते ।
तुकड्या कहे वह मुक्त होते फिर जनम नही पावते ।।
समाज बांधव यांना नम्र विनंती की, आपण आपले परिवारातील आपले आई, वडील किंवा अन्य सभासद यांच्या अस्थी खूप दूर न नेता आपले गावापासून जवळच असलेल्या गुरूकूंज मोझरी ता. तिवसा जि. अमरावती येथे आश्रम परिसरात प्रार्थना मंदिरा समोर वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी निर्माण केलेल्या सर्वतिर्थ अस्थी विसर्जन कुंडात अस्थी विसर्जन करावे ही नम्र विनंती.
निवृत्तीनाथ बैसकार मोझरकर
श्रीरामपूर पुसद
फोन- ९४२३४३४२०९
आपल्या प्रतिक्रिया द्या....