एका घरातून रक्कम उडवून पळून जात असलेल्या अट्टल चोरास तिरोडा पोलिसांनी अटक केली आहे. जगदीश मधुकर कृपाने (२९) रा. विनोबा भावे नगर रामटेक असे अटक झालेल्या आरोपीचे नाव आहे. या अट्टल चोरट्याने शनिवारी (ता. १३) भर दिवसा महात्मा फुले वॉर्ड येथील एका घरी कोणीही नसल्याचे संधी साधत घराच्या मागच्या दाराची कडी काढून बेडरूममध्ये ठेवलेली बॅग व आलमारीतून रोख रक्कम चोरली. मात्र काही वेळातच घरमालक महिला घरी आल्या असता त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी त्वरित तिरोडा पोलीस स्टेशन गाठून ही बाब पोलीस निरीक्षक देविदास कठाळे यांना सांगितली.पोलीस निरीक्षक कठाळे यांच्या निर्देशावरून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आसपास चौकशी करून शोध घेतला. त्यांना एक संशयित व्यक्ती आढळला. त्याला ताब्यात घेऊन पोलीस निरीक्षकासमोर हजर केले असता त्याने आपले नाव जगदीश मधुकर कृपाने रा. विनोबा भावे नगर रामटेक असे सांगितले. पोलिसांनी त्याचा रेकॉर्ड तपासला असता जगदीश अट्टल चोरटा असून त्याने काटोल व कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत अनेक चोऱ्या केल्याची बाब उघड झाली. फिर्यादीच्या तक्रारीवरून तिरोडा पोलिसांत गुन्हा नोंद करून अटक केली.