कोकणातील कौटूंबिक ऐक्य आणि माणूसकी आजही टिकून आहे.येथील माणूस कौटूंबिक ऐक्य आणि आपली धार्मिकता, मानवता व संस्कृती टिकविण्याला प्रथम प्राधान्य देतो. कोकणात घरोघरी मोठ्या आनंदोत्साहात व एकत्र कुटुंबातच गणेशोत्सव साजरा केल्या जातो. कोकणी माणूस हा बहुधा आई-वडिलाच्या घरातच गणपती बसतो. आई-वडीलाच्या पश्चात थोरल्या मुलाच्या घरी किंवा जो आई-वडिलाच्या घरात राहतो. फक्त त्यालाच गणपती बसवण्याचा अधिकार असतो, हा तेथील कडक सामाजिक नियम आहे.
नोकरीच्या निमित्ताने चार भावांची शहरात किंवा गावात चार घरे असली तरी मुळ घरातच गणपती एकच बसवतात.व सर्व भाऊ व त्यांची बायका,मुले तिथे एकाच चुलीवर,दहा दिवस जेवण बनवून त्या घरात राहतात. भावा-भावात कितीही भांडणे असले तरी या दहा दिवसात एकत्र राहणे,एकत्रच स्वयंपाक करून जेवणे व तिथेच झोपणे.हा तिथला कडक नियम आहे.
असे गणपती उत्सवा मुळे एकत्रं आल्याने कधी-कधी जुने भावा भावातील वाद एकत्र आल्याने मिटले जातात.नाही मिटवायचे तरी दहा दिवस कोणीही घरात वाईट बोलणे, भांडण करणे मनाई असते. नाहीतर देवाचा कोप होईल या श्रध्देने सर्वजण मोठी माणसे एकत्र आनंदाने राहतात.मुले तर लगेच एकमेकांत मिसळून जातात.
कोकणात या गणपती सणाच्या निमित्ताने आपलं घर, संपूर्ण गावं भरून जातं. आपुलकीला उधाण येतं.माणसं एकत्र येतात,भेटतात,भजने, दशावतार,शक्ती तुरा नाच,नमन भारुड,कथा इत्यादी कार्यक्रम रात्रीचे वेळी उत्साहात करतात. आणि पुन्हा आपापल्या शहरात पोटं भरण्यासाठी गणपती सणानंतर निघून जातात..!
गणपतीत झालेली माणसांची गर्दी आणि दारासमोर झालेली पादत्राणांची,पाऊलांची दाटी,दहा दिवस सर्व कुटुंब एका छताखाली येणं,गुण्या-गोविंदाने रहाणं आणि सुख-दुःखाच्या गप्पा गोष्टी करणं... पोरांनी आई म्हणून मारलेली प्रेमळ हाक,दिरानी वहिनींकडे हक्काने मागीतलेला कपभर चहा,तुम्ही राहू द्या,मी करते.असा एका जावेने, दुसऱ्या जावेला केलेला प्रेमळ हट्ट हे कोकणात गावा-गावात, घरा-घरात पहायला मिळते.
योग्य वेळी,योग्य वागणं आणि घर नावाच्या मंदिराच्या भिंतीला तडे न जाऊ देणं, ही जीवनाची संस्कृती आज रोजी फक्त कोकणातच आजता गायत टिकून राहीले आहे.कोकणाच्या बाहेर मात्र प्रेम,माया संपत चालली आहे. एक भाऊ कारमधून फिरतोय आणि एकाकडे सायकल पण नाही.एका आई-वडिलाची मुले पण द्वेष, मत्सर वाढत चाललाय.त्यांने मोटारसायकल घेतली की, लगेच दुसरा भाऊ कर्ज काढून कार घेतोय, ही कोकण बाहेरील परिस्थिती आहे.
दुसऱ्या भावाला मदत करायची नाही.या ईर्षेने एक एक भाऊ पेटलेला आहे.आपल्याच आई वडिलाचा त्यांना विसर पडलेला आहे. तसेच इथेतर गावातील टवाळगे बसलेत तुमच्या भावकीत काडी लावायला. व सर्रास भाऊ दुसऱ्याचे ऐकून याला बळी पडतात.संपत्तीवरून बहीणीत वाद आहेत.तर तिच्याकडे बघत पण नाहीत.काय मागते ते द्या ना भावा-बहिणींना. बहीण,भावापुढे कसला स्वार्थ धरता रे? एकाच आईच्या उदरातून येवून माता ऐवजी मातीसाठी,जमीनी साठी भांडता, हे केवढे कुटुंबाचे दुर्दैव आहे. सुधरा,नाहीतर नरक आहे का नाही माहिती नाही, पण तिथे सुद्धा जागा मिळणार नाही...
कोकणातील मानवासारखे वागून बघावे.कोकणात एकाही शेतकऱ्यांने आजपर्यंत आत्महत्या केली नाही.तिकडे चार एकर म्हणजे मोठा शेतकरी, नाहीतर कोकण बाहेर दहा एकरवाला आत्महत्या करतोय. त्याला कारण मोठेपणा व विभक्त कुटुंब पद्धतीमुळे विचाराची देवाणघेवाण होत नाही.व रात्री मुड बनला की,घेतला फास... !
माणसाने साधेपण जपावा,कुटुंबाने वर्षातून दहा दिवस अशा सणाला एकत्र येवून घरी दरवर्षी कोकणा प्रमाणे दहा दिवसाचा सण साजरा करावा. गौराई बसवतात. तसे दोन दिवस बहीणीला घरी बोलवून मातीच्या गौराईवर प्रेम करतात.तसे आपल्याच बहिणीची अवाढव्य सोनं नाणे, कपडालत्ता नाही पण कमीत कमी पुरणपोळी घासाचा तिला पाहुणचार केला पाहीजे, जीवंत आई-बापानी हे पाहिले तर ते गदगद् होतील व नसतील तर त्यांचा आत्मा सर्वास एकत्र पाहून आनंदीत होईल, ही भोळी अपेक्षा जरी असले तरी प्रेम कुटुंबाचे एकत्रित येण्यामुळे द्विगुणित होईल व पुढील वर्षासाठी भावांचे-बहिणींचे,भावा भावांचे एकमेकाला चांगले आशिर्वाद व सहकार्य मिळेल,यात तिळमात्र शंका नाही.गणपती बाप्पा मोरया.... ! (संकलन : संजय कडोळे, गोंधळीनगर कारंजा (लाड) जि. वाशिम.)
आपल्या प्रतिक्रिया द्या....