वाशिम - कलावंतांना पाच हजार रुपये महिना मानधनाची मागणी येत्या हिवाळी अधिवेशनात सर्वसंमतीने मंजूर करणे व तातडीने निवड समिती स्थापन करुन गेल्या पाच वर्षापासून धुळखात पडलेले वृध्द कलावंतांचे प्रस्ताव मंजुर करण्यासह इतर अनेक मागण्यांसाठी विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे यांच्या नेतृत्वात मंगळवार, ५ डिसेंबर रोजी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.तसेच मागण्या मंजुर न झाल्यास येत्या १४ जानेवारीपासून धरणे आंदोलनाचा इशारा देण्यात आला.
निवेदनात नमूद आहे की,सन २०१९ च्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या मंत्रीमंडळ सत्तांतरापासून महाराष्ट्र शासनाने विविध शासकीय,निमशासकीय समित्यांवर अद्याप सदस्यांच्या नेमणुका केलेल्या नसल्यामुळे सर्वच शासकीय निमशासकीय समित्यांचे कामकाज स्थगित झाले आहे.त्याचबरोबर समाजकल्याण अंतर्गत जिल्हा वृद्ध साहित्यीक कलाकार मानधन निवड समिती स्थापन झालेली नसल्यामुळे गेल्या ५ वर्षापासून जिल्हयातील वयोवृद्ध लोककलावंत मानधनापासून वंचित राहीले आहेत.त्यामुळे वृद्ध कलावंतांची उदरनिर्वाह व औषधोपचाराची व्यवस्था नसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे.यामुळे वृध्द कलावंतांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे.त्यामुळे लोककलावंतांच्या मानधनात तातडीने वाढ करण्यासह इतर मागण्यांची पुर्तता करावी.यामध्ये वाढती महागाई लक्षात घेवून वृध्द साहित्यीक व कलावंतांच्या मानधनात शासनाने वाढ करुन ५ हजार रुपये महिना मानधन द्यावे,जिल्हयात वृध्द साहित्यीक कलावंत मानधन निवड समिती स्थापन करुन गेल्या पाच वर्षापासून प्रलंबित वृध्द कलावंतांचे प्रस्ताव मंजुर करुन त्यांना मानधन सुरु करावे,निवड समितीवर कोणत्याही राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याची निवड न करता केवळ लोककलावंतांचीच निवड करावी आदी मागण्या शासनाने त्वरीत पुर्ण कराव्यात. अन्यथा येत्या २४ जानेवारीपासून विदर्भ लोककलावंत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा निवेदनाव्दारे देण्यात आला. निवेदनावर संस्थापक अध्यक्ष संजय कडोळे,राजाराम राऊत, सुरेश आमटे, गजानन पाटील, सुखदेव कोते, रामदास तडसे, हरिदास वाघमारे, लक्ष्मण इंगळे, ललिता शिंगणे, रेखा टोपले, नंदा शिंदे, व्दारका भोजने, पंजाबराव सुर्वे, विठ्ठलराव ठाकरे, शंकरराव खटारे, आनंदा खुळे, लोमेश चौधरी, सौ. तुळसा चौधरी आदींच्या सह्या आहेत.