उन्हाळ्यामध्ये उन्हाचे चटके मुकाट्याने सोसत झाडं उभी असतात. उजाड माळरानात रखरख, दूरवरचे डोंगर उदास आणि आजूबाजूचा परिसर ही कसा भकास दिसतो. प्रतीक्षेचा एक क्षण जात नाही आणि मग एक दिवस पावसाचा सांगावा घेऊन वारा येतो की, काही क्षणांतच पर्जनधारा बरसू लागतात. प्रथम पावसाला पृथ्वीचा दरवळणारा सुगंध सर्वदूर पसरतो. शेत शिवाराला चिंब भिजवणारा, झाडाफुलांना बहरुन टाकणारा, पशु पक्ष्यांना सुखावणारा, मनामनांना फुलवणारा, चित्तवृत्ती उल्हासित करणारा, अवघ्या चराचरालाच नवंचैतन्य बहाल करणारा तो श्रावण आला. तसेच मंगेश पाडगांवकर यांची कविता नकळतच ओठांवर येते. "श्रावणात घननिळा बरसला !"
श्रावण म्हणजे जीवनाच्या आनंद यात्रेतला एक उत्सवच जणू. जेष्ठ, आषाढात दमदार कोसळणारा पाऊस श्रावणात थोडा रमत जमत, उन्हाशी लपंडाव खेळतच बरसतो. या काळात सृष्टी बहरते आणि नवे रुप घेऊन सजते. यावेळी धरती हिरवा शालू धारण करीत असते. निसर्गाचा एक प्रकारचा नयन मनोहर हा चमत्कार पाहून मन आनंदाने भरुन येते. श्रावणातील ऊनपाऊसाच्या खेळात आकाशात इंद्रधनूचा दुहेरी गोफ विणलेला दिसतो. त्यामुळे आपले मन मोहरुन जाते. आपल्याला जगण्याचा नवा उत्साह प्रदान करतो तसेच जगण्याची उमेद मिळते. आपल्या ओठांवर बालकविची कविता येते.
श्रावणमासी हर्ष मानसी,
हिरवळ दाटे चोहिंकडे,
क्षणात येते सरसर शिरवे,
क्षणात फिरुनी ऊन पडे ।।
वरती बघता इंद्रधनूचा,
गोफ दुहेरी विणलासे,
मंगल तोरण काय बांधिले,
नभोमंडपी कुणी भासे ।।
झालासा सूर्यास्त वाटतो,
सांज अहाहा ! तो उघडे,
तरुशिखरांवर उंच घरावर,
पिवळे पिवळे ऊन पडे ।।
अवघं चराचर आनंदात फुलून येत. ही किमया असते, पावसाची वर्षा ऋतूची म्हणजेच श्रावण महिन्याची. शेतकरी या पावसाच्या पाण्याला "देवाचं पाणी" म्हणतात. देवाचं पाणी याचा अर्थ उमजायला वेळ लागतो. उन्हाची झळ ज्यांनी सोसली नाही त्यांना कधीच कळणार नाही, "देवाच्या पाण्याचं गुपितं ! पावसाचा प्रत्येक थेंब अवघ्या सृष्टीला चैतन्य बहाल करतो. हिरव्या पोपटी पानांची लवलव अंगावर मिरवत रुणझुणत्या पावलांनी श्रावण येतो. रिमझिम रेशीमधारा उलगडणाऱ्या झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा फुललेला भासतो.
हा मराठी श्रावण महिना आपल्याकडे अधिक प्रसिद्ध आहे, तो सणांसाठी. सण समारंभ आणि व्रतवैकल्याने भरलेला असा हा मराठी महिना. या श्रावण महिन्यात नागपंचमीची गाणी गावोगावी गायिली जातात आणि वारुळाच्या पूजेकरिता जातात. नंतर रक्षाबंधन हा बहिणभावाचा सण अती आनंदाने येते. बहिण आपल्या भावाला राखी बांधून माझी संकटकाळी सदोदित रक्षा करावी हे यातून सांगत असते. यामधून बहिणभावाचे नातेसबंध दृढ होते. श्रावण महिन्याचे शेवटी शेतकऱ्यांचा बैलांचा पोळा येतो. पोळ्याचे अगोदरचा सण म्हणजे बैलांचे खांदे लोणी व गोवरीने शेकली जाते. दुसरे दिवशी बैलांना सजवून पोळ्याचे तोरणाखाली उभी केली जाऊन झडती गाणे गायिली जातात. हरहर महादेव !
श्रावण महिना हा महादेवाची उपासना करण्याचा महिना मानला जातो. या महिन्यात चार किंवा पाच श्रावण सोमवार येतात. महादेवाचा उपवास करुन शंकराचे पिंडीवर बेलपत्रे वाहिली जातात. या श्रावण महिन्यात गावोगावी पोथी वाचन करून त्याचा भावार्थ सांगितला जातो. हा श्रावण महिना धार्मिक तसेच भक्तीभावाची आधुनिक काळाची सांगड घालून देतो. श्रावण महिन्यात शिवाचा उपवास केल्याने पुण्य मिळते असे लोक समजतात. हा महिना शिवाच्या आवडीचा आहे.
शिव हेच सत्य आहे
शिव सुंदर आहे
शिव अनंत आहे
शिव ब्रम्ह आहे
शिवच शक्ती आणि
शिवच भक्ती आहे !
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्रीगुरुदेव सेवा मंडळ प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....