चंद्रपूर : कामानिमित्य चार दिवसांपासून घराबाहेर गेलेल्या एका 30 वर्षीय तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाचा दगड आणि लोखंडी रॉडने मारहाण करून निर्घूण हत्या करण्यात आल्याची खळबळजणक घटना आज शनिवारी (23 एप्रिल) ला सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली आहे. महेश बबनराव घोडमारे असे मृताचे नाव आहे. ही घटना वरोरा तालुक्यातील शेगाव (बु.) येथे घडली आहे.
पोलिस सुत्रानुसार, वरोरा तालुक्यातील शेगाव (बुज.) येथे महेश बबनराव घोडमारे हे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. ग्रामस्तरावर होणारे किरकोळ तंटेभांडण मार्गी लावण्याचे काम त्यांच्याकडून सुरू होते. सोबतच सामाजिक कार्य म्हणून नागरिकांना लागणारे आवश्यक दाखले, महत्वाचे कागदपत्रे काढून देण्यासाठी ते नेहमी पुढाकार घेवून सामाजिक कार्य करीत होता. त्याच्या सामाजिक कार्याने त्याची परिसरात चांगली प्रतिमा निर्माण झाली होती.
मागील चार दिवसांपासून महेश घोडमारे हा काही कामानिमित्य बाहेर गावी गेला होता. परंतु तो घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी त्याची चौकशी केली असता काहीही माहिती मिळाली नाही. त्यामुळे काल शुक्रवारी (22 एप्रिल) शेगाव पोलिस ठाण्यात भाऊ हरविल्याची लेखी तक्रार भावाने केली. सदर तक्रारीची पोलिसांनी लगेच दखलघ घेत तपासला सुरूवात केली.
आज शनिवारी तंटामुक्त समिती अध्यक्षाचे भावाने शोधाशोध करताना माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, महेश हा कुणाच्यातरी मोटारसायकलने मेसा येथून वरोरा येथे आल्याची माहिती मिळाली. तसेच त्याची मोटार सायकल ही मेसा मार्गावरील जंगलात उभी असल्याची माहिती काही लोकांनी दिली. सदर माहितीची खातरजमा करण्यासाठी घटनास्थळी गाठले. त्या ठिकाणी चप्पल पडलेली, रक्ताचा सळा, तसेच रक्ताने माखलेली लोखंडी रॉड तसेच एका झुडपाआड रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळून आला. दगड आणि रॉडने मारहाण करून हत्या झाल्याची ती परिस्थिती होती. सदर स्थिती बघता भावाला धक्काच बसला. लगेच या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. ठाणेदार अविनाश मेश्राम आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावर आढळून आलेला मृतदेह आणि साहित्याची पहाणी केली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीला पाठविण्यात आले. आढळून आलेल्या मृतदेहाच्या स्थितीवरून दोन दिवसांपूर्वीच हत्या करण्यात आली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तविलेला आहे. सामाजिक कार्यात सर्वपरिचीत असलेल्या महेश घोडमारे हत्या कण्यात आल्याच्या घटनेचा सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. तर गावकरी त्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्तही करीत आहेत
चार दिवसांपासून घरी न आलेल्या तंटामुक्त समितीच्या अध्यक्षाची हत्या झाल्याने निष्पण झाल्याने पोलिसांनी काही व्यक्तींना संशयीत म्हणून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र हत्या का करण्यात आली. हत्येमागचा उदेश्य काय? आरोपी नेमके कोण आहेत. या प्रश्नांच्या मुळाशी जावून शेगाव पोलिस स्टेशनचे ठाणेदार अविनाश मेश्रम तपास करीत आहेत.