चंद्रपूर : शहरातील अष्टभुजा वार्डात एका 22 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घुण हत्या करण्यात आल्याची आज बुधवारी सकाळी 6 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. मंगळवारच्या रात्री दहाच्या सुमारास त्याची हत्या करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणने आहे. धरमवीर यादव उर्फ डब्ल्यू असे मृतकाचे नाव असून तो अष्टभुजा वार्डातील रमाईनगरातील रहिवासी होता. या प्रकरणात हत्येचा मुख्यसुत्रधार आरोपी चेतन उर्फ सचिन सोनवणे याला स्थानिक गुन्हे शाखेला अटक करण्यात आली आहे.
पोलिस सुत्रानुसार, काल मंगळवारी (24 मे ) ला रात्री 10 वाजताच्या सुमारास काही तरुणांनी धरमवीर यादव यांना फोन करून बोलाविले होते. त्यानंतर मित्रांमध्ये भांडण होवून त्याच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी अवस्थेत धरमवीर घटनास्थळावरून पळून गेला. मात्र रमाबाई नगरातील मंदिराजवळ त्यालागाठून मारेकऱ्यांनी त्याची धारधार शस्त्राने हत्या करण्यात आली.
आज बुधवारी सकाळी सहा वाजता ही घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह पडून होता. सदर घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकाचे मदतीने आरोपींचा शोध घेण्यात आला. परंतू शोध लागला नाही. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करून या हत्या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराला अटक केली आहे.
सदर गुन्हयातील मुख्य सुत्रधार आरोपी चेतन उर्फ सचिन सोनवणे हा मोरवा विमानतळ परिसरात जंगलामध्ये लपुन बसल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना मिळाली. त्यावरुन ते स्वतः पथकासह सदर परिसरात जावुन सापळा रचुन त्याचा शोध घेण्यात आला. सदर परिसरात सदर आरोपी दिसुन आला. याला शिताफिने ताब्यात घेतले. सदर आरोपी देखील सदर गुन्हयात जख्मी झालेला आहे. त्याची वैद्यकिय तपासणी करुन रामनगर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आला. सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली बाळासाहेब खाडे, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर व स्थानिक गुन्हे शाखा शोध पथकातील पोहवा संजय आतकुलवार, नापोकॉ दिपक डोंगरे, पोकॉ प्राजल झिलपे, गणेश भोयर, चानापोकॉ चंद्रशेखर आसुटकर स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपुर यांनी केली.