नागभीड : दुचाकीस्वार आशिष मस्के या तरुणाला धडक देऊन मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या फरार ट्रकचालकाला वाहनासह नागभीड पोलिसांनी बुधवारी अटक केली. बाबीसिंग चरणसिंग (४७) टेका नाका, नागपूर असे आरोपीचे नाव आहे.
नागभीड मार्गावर १७ ऑगस्ट २०२३ रोजी भिकेश्वरजवळ आशिष चोखेश्वर मस्के (२४) हा युवक नागभीडकडून ब्रह्मपुरीकडे दुचाकीने जात होता. दरम्यान, ट्रकने दुचाकीस्वार आशीष ला जब्बर धडक देऊन हा चालक बाबीसिंग चरणसिंग फरार झाला. जखमी युवकाला नागभीड ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. यासंदर्भात पोलिस ठाण्यात भादंवि २७९, ३०४ (अ) सहकलम १८४, १३४/१७७ मोवा अन्वये गुन्हा दाखल झाला होता.
या गुन्ह्याचा तपास ठाणेदार योगेश घारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय साखरे, पोलिस नाईक रुपेश मूल्यमवार, रोहित तुमसरे, अजित शेंडे यांनी जलदगतीने केला. आरोपी वाहन चालक आरोपी बाबीसिंग चरणसिंग हा एमएच ३४ एव्ही ०१५७ क्रमांकाचा ट्रक घेऊन नागभीड परिसरात आला होता, अशी माहिती चौकशीत पुढे आली. पोलिसांनी नागपूर व वेगवेगळ्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला नागपुरातून ट्रकसह अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.