महाराष्ट्रातील एक वारकरी संत चोखामेळा हे आहेत. चोखामेळा यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा येथे झाला. त्यांचे वडिल सुदामा आणि आई सावित्रीबाई होत्या. त्यांची पत्नी सोयराबाई, बहिण निर्मला आणि मेहुणा बंका हे देखील विठ्ठल भक्त होते. संत चोखामेळा १३ व्या १४ व्या शतकात होऊन गेले. त्यांची विठ्ठलावरील निस्सीम भक्ती आणि अभंगामुळे ओळख मिळविली. चोखोबांनी सामाजिक विषमतेवर आवाज उठविला आणि त्यांचे अभंग आजही लोकांना प्रेरणा देतात. चोखोबा अस्पृश्य समाजाचे असूनही आपल्या भक्तीने समाजाला नवी दिशा दिली.
संत चोखोबांनी विठ्ठलावर अपार प्रेम केले आणि अनेक अभंग रचले. त्यांचे अभंग आजही वारकरी संप्रदायात महत्त्वाचे मानले जातात. "अबीर गुलाल उधळीत रंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग" हा त्यांचा प्रसिद्ध अभंग आहे. चोखोबांनी समाजातील उच्चनिचता आणि विषमतेवर भाष्य केले. त्यांनी समाजाला समतेचा संदेश दिला. चोखामेळा यांच्या पत्नी सोयराबाई आणि मुलगा कर्ममेळा यांचेसोबत मंगळवेढा येथे राहत होते. संत चोखोबाचा मृत्यू मंगळवेढा येथे गावकुसाची भिंत कोसळून झाला. त्यांच्या अस्थी पंढरपूरात आणल्या गेल्या आणि विठ्ठल मंदिरासमोर त्यांची समाधी बांधण्यात आली. चोखोबांच्या अस्थी अजूनही विठ्ठल विठ्ठल असा जयजयकार करत होत्या. २० व्या शतकात दलित नेते बी. आर. आंबेडकर यांनी मंदिराला भेट देण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना रोखण्यात आले, त्यांना प्रवेश नाकारल्या गेला. संत चोखोबाचा अभंग पाहू या.
हीन याती माझी देवा, कैसी घडे तुझी सेवा ।।१।।
मज दूरदूर हो म्हणती, तुज भेटू कवण्या रीती ।।२।।
माझा लागलाची कर, सिंतोडा घेताती करारा ।।३।।
माझ्या गोविंदा गोपाळा, करुणा भाकी चोखामेळा ।।४।।
हीन याती माझी देवा म्हणजे मी शुद्र जातीचा आहे. देवा तुझी सेवा कसी करु कारण मी अस्पृश्य समाजाचा असल्यामुळे सगळे मला लांब व्हा, दूर व्हा असे म्हणतात. जवळ सुद्धा थांबू देत नाहीत. मग हे असचं चालू राहिलं तर मी तुला कसं भेटू. माझा जर हात लागला किंवा स्पर्श झाला तर विटाळ झाला म्हणतात आणि गोमुत्र शिंपडतात. त्यामुळे माझ्या गोविंदा गोपाळा तुला माझी करुणा येऊ दे. अशी विनवणी संत चोखामेळा विठ्ठलाला करतात.
संत चोखोबांचा मुलगा कर्ममेळा संत कवी होते. त्यांनी त्यांच्या अभंगामध्ये देवावर आरोप केला आहे की, मी कनिष्ठ जातीचा असल्याने माझे जीवन दुःखद बनले गेले. कर्ममेळा यांनी वर्ण व्यवस्थे विरुद्ध बंड केले. संत चोखोबाच्या पत्नी संत सोयराबाई या भक्ती परंपरेतील महिला संत होत्या. त्या दरवर्षी पतीसोबत पंढरपूर जात असे. रुढीवादी ब्राम्हणाकडून त्यांना त्रास दिला जात असे परंतु त्यांनी कधीही श्रद्धा आणि मनःशांती गमावली नाही. संत सोयराबाईचा अभंग पाहू या.
सुखाचे हे नाम आवडीने गावे, वाचे आळवावे विठोबासी ।।१।।
संसार सुखाचा होईल निर्धार, नामाचा गजर सर्व काळ ।।२।।
कामक्रोधाचे न चलेची काही, आशा मनशा पाही भुर होती ।।३।।
आवडी धरोनी वाचे म्हणे हरि हरि, म्हणतसे महारी चोखियाची ।।४।।
खरे सुख हे विठ्ठलाच्या नामातच आहे. हे नाम आपण आनंदाने, आवडीने गावे. वाचे आळवावे म्हणजे सतत मुखात असणे. विठ्ठल नाम आपल्या जिभेवर सतत असावे. विठ्ठलाच्या नावाचा गजर सतत केल्याने तुमचा संसार सुखाचा होईल याची खात्री आहे. जीवनातील सर्व दुःखावर मात करून खरा आनंद मिळेल अशी प्रतिज्ञा संत करतात. काम (वासना) आणि क्रोध यांचा प्रभाव कमी होतो, त्यांचे काहीही चालत नाही. इच्छा आणि मनशा (मनोवृत्ती, आशा) या गोष्टी क्षणभंगूर होतात म्हणजे त्या शक्तीहीन होतात. अशाप्रकारे आवडीने हरि हरि म्हणणारे संत चोखामेळा यांच्या पत्नी स्वतःला महारी चोखियाची हा शद्ब संत सोयराबाई वापरतात.
पुरुषोत्तम बैस्कार, मोझरकर
श्रीगुरुदेव प्रचारक यवतमाळ
फोन- ९९२१७९१६७७
आपल्या प्रतिक्रिया द्या....