वाशिम ( जिल्हा प्रतिनिधी ): : पेरणीची तयारी करून, पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या, वैदर्भिय शेतकऱ्यांना आनंदाची वार्ता देतांना,वाशीम जिल्ह्याच्या ग्राम रुई गोस्ता येथील हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष तथा करंजमहात्म्य परिवाराचे सर्वेसर्वा संजय कडोळे यांना सांगीतले की, "हवेतील वातावरणीय बदलानुसार, मान्सूनचा वेग झपाट्याने वाढत असून,मृग नक्षत्रात पाऊस बरसण्याचे चांगले संकेत मिळत आहेत.त्यामुळे लवकरच जूनच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यात पेरणीयोग्य पाऊस होणार असून विदर्भातील शेतकरी पेरणीलाही लवकरच सुरुवात करणार आहेत." ह्या त्यांच्या अंदाजाप्रमाणे सद्यस्थितीत राज्यातील मुंबई,किनारपट्टी सह आपल्या आजूबाजूच्या पूर्व विदर्भात देखील,काही भाग सोडून बारिक-सारिक किंवा रिमझिम पाऊस येतच असून, पश्चिम विदर्भात वाशिम-अकोला-अमरावती-बुलडाणा जिल्हात मात्र रखरखते ऊन बोचत असून,प्रचंड प्रमाणात वाढलेल्या उकाड्या मुळे सर्वांगात घामाच्या धारा वहात आहेत.मात्र लवकरच या वातावरणात बदल होण्याचे संकेत मिळत असल्याचे, हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांच्या हवाल्याने संजय कडोळे सांगीतले. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दि.०८ जून रोजी मृग नक्षत्राच्या मुहूर्ताला हलका पाऊस पडण्याची शक्यता असली तरीही दि. १२ जून ते १७ जूनच्या दरम्यान राज्याच्या काही भागात मुसळधार ते ढगफुटीसदृश्य पाऊस पडण्याची शक्यता असून या काळात विजांचे कडकडाट होऊन विजा जमिनीवर कोसळण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क रहावे.शिवाय या दरम्यान अनेक भागात नदी नाल्यांना, पांदण रस्त्यांना पूर येण्याची सुद्धा शक्यता दिसते.त्या मध्ये अनेक जिल्ह्यात समाधान कारक पाऊस झाल्याने,शेतकरी पेरणीला सुरुवात करतील. दि १२ ते १७ जून तसेच २० ; २१ ; २२ ; २३ ; २९ जून रोजी पावसाचे चांगले अंदाज आहेत. अशी माहिती आज रोजी हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांनी दिली असल्याने शेतकरी राजा आज तरी आनंद आणि उत्साहात असून पेरणीयोग्य पावसाची प्रतिक्षा करीत आहे. चालू वर्षी निश्चितच अंदाजापेक्षाही समाधान देणारा पाऊस होईल आणि शेतकऱ्यांचा यंदाचा हंगामही चांगला होईल अशी अपेक्षा सर्वच स्तरातून व्यक्त होत आहे.