शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या गोरेलाल चौकातील ए टू झेड महासेलच्या इमारतीला आग लागली. ही आग 18 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास लागली. 4 तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या गोरेलाल चौकातील ए-टू-झेड हे महासेलचे दुकान आहे. सायंकाळ सर्वत्र शांतता असताना परिसरातील लोकांना या दुकानात धुरीचे व काही वेळाने आग लागल्याचे परिसरातील नागरिकांच्या लक्षात आली. त्यानी लगेच पोलिस व अग्निशामक दलाला माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिस ताफा व गोंदिया अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र दुकानात प्लास्टीक आदी ज्वलनशील साहित्य असल्याने काही क्षणात आगीने विक्राळ रुप घेतले. त्यामुळे अदानी विद्युत प्रकल्प व तिरोडा नगर परिषदेच्या अग्निशामक गाड्यांनाही पाचारण करण्यात आले. अखेरीस 16 अग्निशामक गाड्यांच्या मदतीने 4 तासानंतर आग आटोक्यात आली. मात्र तोपर्यंत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. विशेष म्हणजे, आग लागण्यापूर्वी दुकानात काम करणारे काही कर्मचारी उपस्थित होते. आग लागल्याचे पाहताच त्यांनी दुकानातून पळ काढला. मात्र या आगीत दुकानमालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नसून पुढील तपास सुरु आहे.