रिसोड (शहर प्रतिनिधी) - शहरातील इंदिराबाई पांडे ले-आऊट प्रभाग चार मधील सारंगआप्पा जिरवणकर यांचे घराच्या मागुन ते आनंदी चौक पर्यत सिमेंट कॉक्रीट रस्ता व नाली बांधकाम होण्यासाठी माजी खा. अनंतराव देशमुख यांनी शासनाकडून ७५ लाखांचा निधी मंजूर करुन आणला.
त्यानुसार नगर परिषद बांधकाम विभागाने अंदाजपत्रक तयार करुन जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरात मिळाल्यानंतर संबंधीत ठेकेदाराने मागील दोन महिन्यापूर्वी या कामास प्रारंभ करून बाबाराव खडसे यांच्या घरापासून ते आनंदी चौकपर्यत रस्त्याचे व नालीचे बांधकाम पूर्ण केले. परंतु अद्यापही सारंगआप्पा जिरवणकर यांच्या घरामागून ते बाबाराव खडसे यांच्या घरापर्यतच्या नालीचे बांधकाम केले नाही. यासंदर्भात या भागातील काही नागरिकांनी संबंधीत ठेकेदाराकडे विचारणा केली असता ते म्हणाले की, या कामाचा संपूर्ण निधी अद्याप न.प. प्रशासनाला प्राप्त न झाल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून काम बंद आहे. संबंधीत निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त होताच नालीच्या बांधकामास सुरुवात करण्यात येईल असे सांगीतले.