तत्वज्ञानाचे गाढे अभ्यासक असलेल्या,युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांनी "विश्वास" या विषयावर बोलतांना सांगीतले आहे की,"विश्वास जीवन है,संशय मौत है ।"जगातील जास्तित जास्त आणि मानवी आयुष्यातील जवळ जवळ सर्वच नातीगोती,संबंध,व्यवहार हे विश्वासावर अवलंबून असतात.केवळ विश्वासावरच जग चालतं.त्यामुळे आपल्या जीवनात संसाराचे राहाटगाडगे चालवीत असतांना माणसाने विश्वासाला हृदयापार जपलं पाहीजे.कारण प्रत्येक व्यवहार आपण कागदोपत्री स्टॅम्पवर करू शकत नाही.किंवा प्रत्येक व्यवहारात साक्षीपुरावे ठेवत नसतात. हे विश्वासाच्या व्यवहाराचे कटूसत्य असते. संसारातील अनेकानेक व्यवहार हे तोंडी जबानीवर चालत असतात.म्हणूनच जबान म्हणजे मुखातून निघालेला शब्द हा मनुष्याने व्यवहारात सांभाळलाच पाहीजे.पती पत्नीचे नाते सुध्दा केवळ विश्वासावरच राखले जात असते.पतीपत्नी,गुरुशिष्य,मित्रमैत्रिणी,मालक नोकर,राजकिय पक्ष किंवा संस्था आणि पदाधिकारी किंवा कार्यकर्ते,न्याय व्यवस्था फिर्यादी, प्रधानमंत्री किंवा इतरही राज्यकर्ते आणि लोकशाहीतील नागरीक यांचे ऋणानुबंध हे विश्वासावरच अवलंबून असतात.नव्हे,नव्हे टिकून असतात.खरे तर विश्वासाचेच नाव प्रेम असे आहे.प्रेम हे ज्याप्रमाणे संसाराचे सार आहे.त्याचप्रमाणे विश्वास हा संसाराचा महासार आहे.विश्वास म्हणजे शाश्वत सत्य आहे.सत्याचा केव्हाच पराभव होत नाही.परंतु सत्याच्या कितीतरी पुढे असत्य कितीतरी वेगाने धावत असते. परंतु विश्वास कायम असला तर कायमच असत्याचा पराभव होत असतो. सात्विक माणसाचे एक स्वभाव असतो तो म्हणजे,एकदा का एखाद्याचा विश्वासघात झाला की,तो आजन्म तुमच्यावर केव्हाही विश्वास ठेवत नाही.आयुष्यात धन-दौलत-पैसा मिळविणे अगदी सरळसोपे आहे.परंतु विश्वास संपादित करणे अवघड आहे.त्यामुळे मनुष्याने आल्या जन्मी आपणावर विश्वास ठेवणाऱ्या कुण्या व्यक्तिचा विश्वासघात करण्याचे कुप्रवृत्ती ठेवण्याचे व्यर्थ धाडस करूच नये.आपण स्वतःही कुणावर तरी विश्वास ठेवत असतो.मग तो स्वतःच्या कुटूंबात असो,भावकीत असो,सोयऱ्याधायऱ्यात असो किंवा तुमच्या व्यवहारात असो कायमच आपले अख्खे जीवन विश्वासावर अवलंबून असते.मग आपण जसे इतरांवर विश्वास ठेवून असतो तशाच प्रकारे दुसऱ्या व्यक्ती सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवून असतात.त्यामुळे आपण स्वतःही विश्वासपूर्वक सन्मानाने जगलं पाहीजे आणि इतरांनाही विश्वासाने जगू दिले पाहीजे.एकदा का तुम्ही कुणाचा चुकूनही विश्वासघात केला तर त्यामुळे मनुष्य बदनाम होतो.परत त्याचेवर कुणीही कधीही विश्वास ठेवतच नाही.त्यामुळे तुमचे शिल म्हणजे चारित्र्य हनन होऊ शकते.त्यामुळे तुमचे शिल म्हणजे चारित्र्य जपण्याकरीता तुम्ही आयुष्यभर दुसऱ्याचा विश्वास संपादन करीत विश्वासाने चारित्र्यवान व्यक्तीचे आयुष्य जगलं पाहीजे.व हे केवळ तुमच्या स्वतःच्या स्वाधीन आहे.
लेखक :
संजय कडोळे (पत्रकार) अध्यक्ष - ज्ञानगंगा साहित्य मंडळ, कारंजा (लाड) जि.वाशिम. संवाद : ९०७५६३५३३८