जिल्ह्यातील अनेक आरमोरी पोलिस स्टेशनमध्ये विविध कलमाद्वारे गुन्हे दाखल असणार्या सराईत गुन्हेगारास आरमोरी पोलिसांनी अखेर जेरबंद केले. प्रकाश आनंदराव मेडपल्लीवार (30) रा.चाकलपेठ ता. चामोर्शी जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, यातील फिर्यादी नीलकंठ उरकुडा प्रधान (40) हे 16 जुलै रोजी रोजी सकाळी 11.30 वाजताच्या दरम्यान शेती पिकावरील फवारणीची औषधी घेण्याकरिता मोटारसायकलने आरमोरीकडे जात होते. पुरेसे पैसे नसल्याने गुरुदेव बगमारे (रा. रुई) यांच्याकडून 16 हजार रुपये घेऊन आरमोरीकडे जाण्यास निघाले.
दरम्यान, पानठेल्यावर उभा असलेला अनोळखी इसम प्रधान यांना (आरोपी) त्याने मला पण आरमोरीला जायचं आहे, असे सांगून लिफ्ट मागितली. पावसाचे वातावरण असल्याने साधा मोबाईल किमत 1000/-रुपये व 16,000 रुपये रोख गाडीच्या डिक्कीत ठेऊन पुढे निघाले. दरम्यान, अरसोडा फाट्याजवळील सावजी धाब्याजवळ लघू विश्रांतीसाठी थांबले असता त्या अनोळखी इसमाने(आरोपीने) वाहनासह 32 हजार रुपये लंपास केले असल्याची तक्रार फिर्यादीने 18 जुलै रोजी आरमोरी पोलिसांत दिली होती. ठाणेदार संदीप मंडलिक यांनी या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिस पथक तयार केले.
घटनेच्या दिवशी सदर सराईत आरोपीने फिर्यादीच्या मोबाइलवरून चंद्रपूर येथील एका व्यक्तीस फोन केला होता. आरमोरी पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून चंद्रपूर येथील व्यक्तीला बोलते केले असता त्याने माझ्या मोबाईलवर प्रकाश आनंदराव मेडपल्लीवार यांनी फोन केल्याचे सांगीतले. त्यानंतर वेळ न घालवता ठाणेदार संदीप मंडलिक यांचे मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक सचिन भिलारी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक चिकणकर व त्यांच्या पथकाने सराईत आरोपी प्रकाश मेडपल्लीवार यास त्याच्या चाकलपेठ या गावून 22 जुलैला सायंकाळी 6.15 वाजता अटक केली. आरमोरी पोलिसांनी सदर सराईत आरोपी याच्यावर भांदवी 379 कलमाद्वारे गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचे तपासात आरोपीस विचारपूस केले असता तो उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने न्यायालयात 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आरोपी प्रकाश मेडपल्लीवार यांच्यावर गडचिरोली, पेंढरी, वडसा, आरमोरी आदी आरमोर पोलिस ठाण्यात विविध कलमाद्वारे गुन्हे नोंद असून तो सराईत गुन्हेगार आहे. सदर आरोपी हा आरमोरी पोलिसांच्या जाळ्यात सापडल्याने त्याने आतापर्यंत केलेले अनेक गुन्हे उजेडात येण्याची दाट शक्यता आहे. सदर आरोपी हा कमी भावात डिझेल, पेट्रोल आणून देण्याचे आमिष शेतकर्यांना दाखवून त्यांची गाडी व पैसे घेऊन पोबारा करतो. अशा व्यक्तींपासून शेतकर्यांनी सावध राहण्याचे आवाहन ठाणेदार संदीप मंडलिक यांनी केले आहे. अधिक तपास आरमोरी पोलिस स्टेशनचे ठाणेदार संदीप मंडलिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सचिन भिलारी, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक गौतम चिकणकर, पोलिस नाईक ताटपलंग करीत आहेत.