कारंजा (जिल्हा प्रतिनिधी संजय कडोळे) शासनाकडून निराधार, वयोवृद्ध,विधवा,अनाथ,दिव्यांग यांच्याकरीता कारंजा तहसिल कार्यालयातील,संजय गांधी निराधार योजना विभागामार्फत, कारंजा शहर व तालुक्यातील नागरिकांकरीता चालवीली जाते. या योजनेकरता महा ई सेवा केन्द्रामार्फतच ऑनलाईन प्रस्ताव स्विकारले जात असतात.आणि त्याकरिता महा ई सेवा केन्द्राची शासकिय फीची मोजकी रक्कमच द्यावी लागते.या संदर्भात कारंजाचे तहसिलदार कुणाल झाल्टे यांनी निराधार नागरिकांना सतर्क करतांना प्रसिद्धी पत्रकातून आवाहन केले की, "आपणास कार्यालयातील कुणीही कर्मचारी / अधिकारी किंवा कार्यालया बाहेरील कोणीही दलाल किंवा मध्यस्थ जर आपले निराधार निवृत्ती योजनेचे प्रकरण मंजूर करण्याकरीता पैशाची मागणी करीत आपली फसवणूक करीत असेल तर कोणत्याही प्रकारे पैशाची देवाण घेवाण करू नये. उलटपक्षी अशा प्रकारे पैशाची कुणीही मागणी केली तर अशा व्यक्तीला न घाबरता त्या संबधित व्यक्तीची लेखी तक्रार द्यावी. तक्रार देणाऱ्या व्यक्तिचे नाव, तहसिल कार्यालयाकडून गुप्त ठेवण्यात येईल."असे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.